१ मे रोजी ध्वजारोहण केवळ एकाच ठिकाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:15 IST2021-04-30T04:15:40+5:302021-04-30T04:15:40+5:30

अमरावती : विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी विभागीय आयुक्तांनी ध्वजारोहण समारंभाकरीता योग्य ती व्यवस्था करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहणाचा वेगळा कार्यक्रम आयोजित करू ...

Flag hoisting at only one place on May 1 | १ मे रोजी ध्वजारोहण केवळ एकाच ठिकाणी

१ मे रोजी ध्वजारोहण केवळ एकाच ठिकाणी

अमरावती : विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी विभागीय आयुक्तांनी ध्वजारोहण समारंभाकरीता योग्य ती व्यवस्था करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहणाचा वेगळा कार्यक्रम आयोजित करू नये, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार येथील विभागीय आयुक्त कार्यालय येथे १ मे रोजी सकाळी ८ वाजता फक्त ध्वजारोहण करण्यात येईल. अन्यत्र कुठेही कार्यक्रम होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतुदी विचारात घेऊन राज्यात यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षीप्रमाणेच अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात येणार आहे. ध्वजारोहण करणारे पालकमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकल्यास, विभागीय आयुक्तांनी ध्वजारोहण करावे, अशा सूचना आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेमार्फत याबाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाने कोविडच्या अनुषंगाने दिलेल्या सुरक्षित अंतर व इतर सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे सर्वांसाठी मास्क बंधनकारक राहील, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना आहे.

कोरोनाबाधितांची वाढती रुग्ण संख्या विचारात घेऊन कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी व विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केले आहेत. या तरतुदी विचारात घेऊन राज्यात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच अत्यंत साधेपणाने करण्याच्या दृष्टीने विविध निर्देश देण्यात आले आहेत.

बॉक्स

मोजकी उपस्थिती राहणार

नमूद ठिकाणी केवळ पालकमंत्री, विभागीय आयुक्त मुख्यालयी समारंभ असल्यास विभागीय आयुक्त, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी, ज्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय आहे. त्या ठिकाणचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलीस अधिक्षक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एवढ्याच पदाधिकारी, अधिकारी यांनी उपस्थित रहावे. इतर मान्यवरांना आमंत्रित करण्यात येवू नये. तसेच कवायती/संचलन आयोजन करण्यात येऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Flag hoisting at only one place on May 1