दरोड्याच्या प्रयत्नातील पाच जणांना अटक

By Admin | Updated: March 27, 2017 00:03 IST2017-03-27T00:03:19+5:302017-03-27T00:03:19+5:30

दरोड्याच्या प्रयत्नात असणाऱ्या पाच आरोपींना कोतवाली पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री खापर्डे बगिचा परिसरातून अटक केली.

Five people arrested for the robbery attempt | दरोड्याच्या प्रयत्नातील पाच जणांना अटक

दरोड्याच्या प्रयत्नातील पाच जणांना अटक

खापर्डे बगिचातील घटना : तलवार, चाकू, तिखट जप्त
अमरावती : दरोड्याच्या प्रयत्नात असणाऱ्या पाच आरोपींना कोतवाली पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री खापर्डे बगिचा परिसरातून अटक केली. रोशन गुलाब मगरे (२४, महेंद्र कॉलनी), अभिजीत किसन तायवाडे (२६, छत्रसालनगर), अक्षय उत्तम ढोले (२३, रमाबाई आंबेडकरनगर), सूरज प्रकाश इंगोले (२०, कपिलवस्तूनगर) व रवि किसन खडसे (२५, बेलपुरा), अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.
कोतवाली पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक निलिमा आरज यांच्या मार्गदर्शनात परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक नरेश मुंडे यांच्या पथकातील पोलीस नाईक अब्दुल कलाम, गजानन ढेवले, सागर ठाकरे, प्रफुल्ल खोब्रागडे व विनोद भगत शनिवारी मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास खापर्डे बगिचा परिसरात गस्तीवर असताना त्यांना काही युवक अंधारात लपून बसल्याचे आढळून आले.

पूर्वाश्रमीचे गुन्हे तपासणार
अमरावती : पोलिसांनी तत्काळ सापळा रचून यापाच जणांना घेराव घालून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची चौकशी करून झडती घेतली असता त्यांच्याजवळ तलवार, दोन चाकू, एक स्टेपनी व तिखट असल्याचे आढळून आले. पोलिसांनी पाचही जणांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता ते दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक करून ठाण्यात नेले. रविवारी पाचही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने पाचही जणांना पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी शहरात नेमके कोणत्या ठिकाणी दरोडा टाकणार होते, यापूर्वी त्यांनी काही दरोडे टाकलेत का, आरोपी रेकार्डवरील आहेत का, असे अनेक प्रश्न पोलीस चौकशीनंतर उघड होणार आहे.

रवी खडसेवर चोरीचे गुन्हे
सराईत गुन्हेगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रवि खडसे याच्यावर विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे गुन्हे दाखल आहेत. दरोड्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपींमध्ये रवी खडसेचाही सहभाग असल्यामुळे चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.

पेट्रोलिंगदरम्यान पाच जण अंधारात लपून बसल्याचे आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता ते दरोड्याच्या प्रयत्नात असल्याचे त्यांच्याजवळ आढळून आलेल्या साहित्यावरून निदर्शनास आले. पाचही जणांना अटक करण्यात आली आहे.
- नीलिमा आरज, प्रभारी पोलीस निरीक्षक, कोतवाली ठाणे.

Web Title: Five people arrested for the robbery attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.