मासेमारांचे जाळे ठरताहेत सर्पांसाठी मृत्यूचे सापळे
By Admin | Updated: December 14, 2015 00:17 IST2015-12-14T00:17:56+5:302015-12-14T00:17:56+5:30
जिल्ह्यातील बहुतांश तलावावर मासेमारी चालत असून मासेमाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे सापांचा मृत्यू होत असल्याचा संशय वन्यप्रेमींनी वर्तविला आहे.

मासेमारांचे जाळे ठरताहेत सर्पांसाठी मृत्यूचे सापळे
तीन पानदिवड सापांचा मृत्यू : निसर्गाच्या अन्नसाखळीवर प्रभाव पडण्याची शक्यता
अमरावती : जिल्ह्यातील बहुतांश तलावावर मासेमारी चालत असून मासेमाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे सापांचा मृत्यू होत असल्याचा संशय वन्यप्रेमींनी वर्तविला आहे. वन्यजीव अभ्यासक छत्री तलावातील प्लास्टिक स्वच्छ करण्याकरिता गेले असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला.
अमरावती शहरानजीकच्या परिसरात २४ तलाव असून जिल्ह्यात ५७ तलाव आहेत. यापैकी बहुतांश तलावावर मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. मासेमारी अनेक गरीब कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. मात्र, या तलावात नुसते मासेच नसून संपूर्ण जल परिसंस्था तिथे अस्तित्वात आहे. मासे हा जल परिसंस्थेचा घटक आहे. जलीय परिसंस्थेत अन्नजाळे कार्यरत असते. त्यामुळे निसर्ग चक्रात प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे. शेवाळ व इतर पाणवनस्पती, लहान व मोठे कीटक, शिंपले, बेडूक, मासे त्यावर जगणारे पक्षी व साप अशी एकूण अन्नसाखळी आहे. मासेमारी करणारे जल घटकांशी कोणताही आत्मीयता न दाखविता मासेमारीसोबत अन्य पाण्यातील जीवजंतूवरही प्रहार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. वन्यजीव अभ्यासक यादव तरटे व त्यांचे सहकारी धनंजय भांबूरकर, सुरेश खांडेकर हे छत्री तलाव परिसरातील प्लास्टिक कचरा स्वच्छ करीत होते. तेव्हा मासेमाऱ्यांनी काठावर ठेवलेल्या जाळ्यात तीन मोठे साप मृतावस्थेत आढळले. त्यामध्ये पानदिवड प्रजातीचे साप होते. त्यामुळे मासेमारीसोबत जलामधील सरपटणाऱ्या प्राण्यावरही घात होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वन्यजीव अभ्यासक यांनी स्थानिक मासेमाऱ्यांना भेटून या गोष्टीची कल्पना दिली व त्यांना समजावून सांगितले. मृत सापांच काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
मासेमाऱ्यांनी मासेमारी करताना तलावाच्या काठावर बेवारस जाळे ठेऊन नयेत. आपले पोट भरताना इतर प्राण्यांचा जीव जाणार नाही याची काळजी घ्यावी व अप्रत्यक्ष पक्षी व सर्प संवर्धन करण्यात सहकार्य करावे.
- यादव तरटे,
वन्यजीव अभ्यासक
पानदिवड सापाचे महत्त्व
पानदिवड साप पाणथळ ठिकाणी आढळतो. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या अनुसूची २ मध्ये या सापाचा सहभाग आहे. नाले, ओहाळ, नद्या व तलाव हा याचा अधिवास आहे. बेंडकुळ्या (लहान बेडके) व बेडूक हे यांचे मुख्य खाद्य आहे. हा साप बिनविषारी साप असून मानवाला यांच्यापासून कोणताही धोका नाही.
सापाचे अस्तित्व धोक्यात
सर्पमित्र सर्पसंवर्धनाचा उद्देश ठेवून सापांचा जीव वाचवून त्यांना जंगलात सोडतात. पण जंगलजवळच असणाऱ्या पानथळीच्या ठिकाणी असलेल्या बेवारस पडलेले जाळे त्यांच्या जीवावर बेतत आहे. छत्री तलाव येथे सन २०१३ मध्ये दोन पक्षी, सन २०१५ मध्ये २ साप व एक पक्षी जाळ्यात अडकून दगावले. पोहरा तलाव येथे सन २०१४ मध्ये दोन कासवांचा मृत्यू झाला. त्यामुळे जंगलात सोडलेल्या सापांचेही अस्तित्व धोक्यात असल्याचे दिसून येत आहे.