पहिली फेरी: किरण सरनाईक 6088, श्रीकांत देशपांडे 5122
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 05:00 IST2020-12-04T05:00:00+5:302020-12-04T05:00:33+5:30
विलासनगरातील शासकीय गोदामात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. दोन हॉलमधील १४ टेबलवर प्रत्येकी २५ मतांचे ४० गठ्ठे मोजणीसाठी देण्यात आले. पहिल्या फेरीतील मतपत्रिकांच्या तपासणीत ४८८ मते अवैध ठरल्याने उरलेल्या १३,५११ मतांची मोजणी करण्यात आली. यामध्ये सर्वांना धक्का देत अपक्ष उमेदवार सरनाईक यांनी ३,१३१ मते घेत देशपांडे यांच्यावर ८३१ मतांची आघाडी मिळविली. या फेरीत देशपांडे यांना २,३००, तर भोयर यांना २,०७८ मते मिळाली. पहिल्या फेरीची मते जाहीर व्हायला दुपारचे ३.३० वाजले.

पहिली फेरी: किरण सरनाईक 6088, श्रीकांत देशपांडे 5122
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शिक्षक मतदारसंघासाठी गुरुवारी सुरू असलेल्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांना सर्वाधिक ६,०८८ मते मिळाली. विद्यमान आमदार व महाआघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना ५,१२२ व अन्य अपक्ष उमेदवार शेखर भोयर यांना ४,८८९ मते मिळाली. विजयासाठी १४,९१६ मतांचा कोटा निश्चित झाल्याने आता दुसऱ्या क्रमांकाच्या मतांसाठी रात्री उशीरापर्यंत चांगलीच रस्सीखेच होणार आहे.
येथील विलासनगरातील शासकीय गोदामात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. दोन हॉलमधील १४ टेबलवर प्रत्येकी २५ मतांचे ४० गठ्ठे मोजणीसाठी देण्यात आले. पहिल्या फेरीतील मतपत्रिकांच्या तपासणीत ४८८ मते अवैध ठरल्याने उरलेल्या १३,५११ मतांची मोजणी करण्यात आली. यामध्ये सर्वांना धक्का देत अपक्ष उमेदवार सरनाईक यांनी ३,१३१ मते घेत देशपांडे यांच्यावर ८३१ मतांची आघाडी मिळविली. या फेरीत देशपांडे यांना २,३००, तर भोयर यांना २,०७८ मते मिळाली. पहिल्या फेरीची मते जाहीर व्हायला दुपारचे ३.३० वाजले. त्यानंतर उरलेल्या मतांच्या मोजणीसाठी दुसरी फेरी सुरू झाली. या फेरीचा निकाल जाहीर व्हायला रात्रीचे ८ वाजले. या फेरीतही ६०१ मते अवैध ठरल्याने एकूण १,०८९ मते बाद झालीत व २९,८२९ मते वैध ठरली. त्यामुळे विजयासाठी १४,९१६ मतांचा कोठा निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी जाहीर केला.
यानंतर रात्री ९ वाजतापासून दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झाली. यामध्ये सर्वात कमी असलेल्या उमेदवाराच्या दुसऱ्या क्रमाकांची मते मोजण्यात येऊन या उमेदवाराला बाद करण्यात येणार आहे. असाच क्रम आता विजयी मतांचा कोटा मिळेपर्यंत सुरू राहील व शेवटपर्यंत एकाही उमेदवाराला निश्चित कोट्याएवढी मते न मिळाल्यास सर्वाधिक मते असणारा उमेदवार विजयी होईल, असे निवडणूक विभागाने सांगितले. यापूर्वी सन २०१४ हीच स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे यंदा विजयी मतांचा कोटा कोण मिळवितात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पहिल्या दोन फेरीतील उमेदवारनिहाय मते
किरण सरनाईक ६०८८, श्रीकांत देशपांडे ५१२२, शेखर भोयर ४८८९, संगीता शिंदे २,८५७ अविनाश बोर्डे २४४७, नितीन धांडे २१२७, नीलेश गावंडे २१२२, प्रकाश काळबांडे १२१९, दिलीप निंबोरकर ५५५, विकास सावरकर ६२५, राजकुमार बोनकीले ५७२, महेश दवरे २९०, अरविंद तट्टे ७९, सुनील पवार ५६, शरदचंद्र हिंगे ५४, अनिल काळे २६, अभिजित देशमुख २३, तनवीर आलम २६, संजय आसोले १०४, उपेंद्र पाटील ३५, सतीश काळे ८९, दिपंकर तेलगोटे १६, प्रवीण विधळे १६, मुस्ताक शहा २५, विनोद मेश्राम १५, मोहम्द शकील ३२, श्रीकृष्ण ठाकरे यांना २० मते मिळाली.
१,०८९ मते अवैध
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण ३०,८६९ मतदान झाले. या मतांच्या तपासणीत तब्बल १,०८९ मते अवैध ठरविण्यात आली, ही ३.६५ टक्केवारी आहे. निवडणूक विभागाद्वारा मतदान कसे करावे याविषयी सातत्याने जनजागृती करण्यात आल्यानंतरही एवढ्या संख्येनी मतदान अवैध ठरले.