महापालिकेच्या भिंतीवर कालबाह्य अग्निशमन यंत्रे
By Admin | Updated: June 14, 2014 01:19 IST2014-06-14T01:19:29+5:302014-06-14T01:19:29+5:30
दोन वर्षांपूर्वी मंत्रालयात आग लागल्याच्या घटनेनंतर राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘फायर आॅडिट’ करण्यात आले.

महापालिकेच्या भिंतीवर कालबाह्य अग्निशमन यंत्रे
अमरावती : दोन वर्षांपूर्वी मंत्रालयात आग लागल्याच्या घटनेनंतर राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘फायर आॅडिट’ करण्यात आले. त्यानुसार महापालिकेत एखाद्या
प्रसंगी आग लागल्यास त्यावर नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना म्हणून अग्निशमन यंत्रे लावण्यात आली; मात्र या अग्निशमन यंत्राची मर्यादा संपली असताना त्यांचे
नूतनीकरण करण्यात आले नाही. परिणामी हा खर्च वाया जातो का? अशी भीती वर्तविली जात आहे.
मंत्रालयात आग लागल्यानंतर झालेली हानी, कागदपत्रांचे नुकसान आणि खबरदारीच्या उपाययोजनांसाठी शासनाने महापालिका, नगरपरिषदांचे स्वतंत्र ‘फायर आॅडिट’
करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महापालिकेत अग्निशमन यंत्रे, सुरक्षा खिडकी व दरवाजे, पायऱ्या आदींची व्यवस्था करण्यात आली. एखाद्या प्रसंगी आग लागल्यास
अधिकारी, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर पडता यावे, त्याकरिता खिडकी, दरवाजे तयार करण्यात आली आहेत. एवढेच नव्हे तर मुख्य ठिकाणी भिंतीवर
अग्निशमन यंत्रे लावण्यात आली आहेत. मात्र या यंत्राची मर्यादा संपल्याने ते कालबाह्य झाले आहेत. आग लागल्यास हे अग्निशमन यंत्रे निरूपयोगी ठरतील, हे वास्तव आहे.
महापालिका मुख्य इमारत, अग्निशमन विभाग व पाच झोन कार्यालये असे लावण्यात आलेल्या एकूण १५० अग्निशमन यंत्राचा कालावधी २१ मार्च २०१३ पर्यंत निश्चित
होता. त्यानंतर या यंत्राचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. मात्र तिसरा महिना आला असतानासुध्दा या अग्निशमन यंत्राचे नूतनीकरण करण्यात आले नाही. ही यंत्रे भिंतीवर
केवळ शोभेच्या वस्तू ठरू लागल्या आहेत.
मोठा गाजावाजा करून ‘फायर आॅडिट’ करण्यात आले. अग्निशमन सुरक्षा निधीतून पाच लाख रूपये खर्चून ही यंत्रे खरेदी करण्यात आली. परंतु या यंत्राच्या
नूतनीकरणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष चालविल्याने ती कुचकामी ठरेल, अशी स्थिती आहे.