अखेर ओटीपीची तांत्रिक अडचण दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:12 IST2021-03-20T04:12:47+5:302021-03-20T04:12:47+5:30
अमरावती : आरटीई अर्ज प्रक्रियेला लागलेले तांत्रिक अडचणीचे ग्रहण दूर झाले आहे. पालकांच्या तक्रारींची दखल घेऊन ओटीपीची तांत्रिक अडचण ...

अखेर ओटीपीची तांत्रिक अडचण दूर
अमरावती : आरटीई अर्ज प्रक्रियेला लागलेले तांत्रिक अडचणीचे ग्रहण दूर झाले आहे. पालकांच्या तक्रारींची दखल घेऊन ओटीपीची तांत्रिक अडचण दूर झाली आहे. याबाबतची अधिक माहिती शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आरटीई पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे. पालकांना ओटीपी प्राप्त होऊ लागल्याने आरटीई प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.
सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण अर्थात आरटीईनुसार खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही पालकांना पोर्टलच्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. बहुतांश पालकांना नाव नोंदणीनंतर ओटीपी मिळत नसल्याने अर्ज सादर करणे अशक्य होत होते. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. दुसरीकडे घरापासून एक किलोमीटर अंतरातील शाळा आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी पात्र असतात. त्यासाठी पालकांच्या रहिवास ठिकाणांची गुगल लोकेशनव्दारे नोंद केली जाते. मात्र, पोर्टलवरील तांत्रिक समस्येमुळे काही पालकांना योग्य लोकेशन नोंदविण्यातही अडचणी येत होत्या. गुगल लोकेशनची नोंद योग्यरीत्या होत नसल्याने शाळा निवडताना अडचणी येत असल्याच्या तक्रार पालकांनी शिक्षण विभागाकडे केल्यावर त्याची दखल घेऊन आरटीई पोर्टलमधील अडचणी सोडविण्यात आल्या आहेत. दरम्यान, आरटीई पोर्टलच्या तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून पालकांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरून सादर करावी तसेच पुन्हा अडचण आल्यास पालकांनी संबंधित मदत केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
बॉक्स
जिल्ह्यातील आरटीईची स्थिती
शाळा २४४
उपलब्ध जागा २०७६
आतापर्यंत प्राप्त अर्ज ४३८२