अखेर एसटी बसेसला महामंडळाच्या पेट्रोल पंपावर इंधन पुरवठा
By जितेंद्र दखने | Updated: March 25, 2023 17:49 IST2023-03-25T17:48:30+5:302023-03-25T17:49:13+5:30
प्रवाशांचा वाचणार वेळ; पैशांची होणार बचत

अखेर एसटी बसेसला महामंडळाच्या पेट्रोल पंपावर इंधन पुरवठा
अमरावती : लॉकडाऊन कालावधीत पेट्रोल, डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. त्यामुळे खुल्या बाजारातून पेट्रोल, डिझेल खरेदी करणे एसटी महामंडळाला परवडत नव्हते. परिणामी एसटी महामंडळाने आपल्या मालकीचे पेट्रोल पंप गत नऊ महिन्यांपासून बंद ठेवून एसटी बस गाड्यांमध्ये खासगी पेट्रोल पंपावरून डिझेल, पेट्रोल भरले जात होते. मात्र, आता डिझेल कंपन्यांनी घाऊक डिझेलचे दर कमी केल्याने एसटी महामंडळाने पुन्हा जिल्ह्यातील अमरावती, बडनेरा, चांदूर बाजार, दर्यापूर, परतवाडा, वरूड, चांदूर रेल्वे अशा सात बसस्थानकातील पेट्रोल पंप सुरू केले आहेत.
मोर्शी आगारातील पेट्रोल पंप तांत्रिक बिघाडामुळे सध्या बंद आहे. त्यामुळे या आगारातील एसटी बसला एसटी महामंडळाच्या दुसऱ्या आगारामधून इंधन पुरवठा केला जात असल्याचे विभाग नियंत्रक कार्यालयाकडून सांगण्यात आले. अमरावती विभागात एसटी महामंडळाच्या मालकीचे ८ पेट्रोल पंप आहेत.त्यापैकी ७ पेट्रोल पंप पुन्हा सुरू केले आहेत.
एसटीचे पेट्रोल पंप सुरू झाल्याने एका लिटरमागे साधारणपणे दोन ते अडीच रुपयांची एसटीची बचत होणार असून, प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. जेव्हा एसटीने महामंडळाने स्वतःचे पेट्रोल पंप बंद करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तेव्हा एसटीला लिटरमध्ये १६ रुपये अधिक द्यावे लागत होते.
दोन महिन्यांपूर्वीच पत्र
एसटीने महामंडळाने त्यांचे पेट्रोल पंप पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्या दृष्टीने त्यांनी दोन महिन्यांपूर्वीच याविषयी सर्व आकारांना महामंडळांना पत्र दिले आहे. आगारातील डिझेल पंप वजन व मापे निरीक्षक यांच्याकडून प्रमाणित करून घ्यावी तसेच डिझेल साठवणुकीचा परवाना अद्ययावत करून घ्यावा ज्यामुळे डिझेल वितरणात अडचण येणार नाही, अशी या पत्रात म्हटले आहे. त्यानंतर आता एसटी महामंडळाने आपल्या मालकीचे पेट्रोल पंप सुरू केलेले आहेत.
राज्य परिवहन महामंडळाचे अमरावती विभागातील पेट्रोल पंप गत सात-आठ महिन्यांपासून काही कारणांमुळे बंद होते. मात्र १ मार्चपासून विभागातील ८ पैकी ७ पेट्रोल पंप सुरू आहे. मोर्शी आगारातील पंप तांत्रिक कारणामुळे बंद आहे. तेही लवकरच सुरू होईल.
- नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक