अखेर पदवी, पदव्युत्तर प्रवेशाला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:19 IST2020-12-05T04:19:12+5:302020-12-05T04:19:12+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शुक्रवारी ...

अखेर पदवी, पदव्युत्तर प्रवेशाला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शुक्रवारी झालेल्या विद्वत परिषदेच्या ऑनलाईन बैठकीत याविषयी निर्णय घेण्यात आला. ‘लोकमत’ने ४ डिसेंबर रोजी ‘पदवी, पदव्युत्तर प्रवेशाला मिळणार मुदतवाढ’ यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले, हे विशेष.
विद्यापीठाने २६ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान अंतिम वर्षाच्या परीक्षांचे नियोजन केले. त्यानंतर निकाल जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, विद्यापीठात अंतिम सत्र वगळता अन्य सत्रांच्या गुणपत्रिका पोहोचल्या नसल्याने ५० टक्के विद्यार्थ्यांचे निकाल रोखण्यात आले आहे. अशातच विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये पदवी, पदव्युत्तर प्रवेशाची तारीख जाहीर झाली. त्यामुळे निकाल जाहीर होऊनही ‘विथहेल्ड’मुळे विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळालेल्या नाही. दुसरीकडे प्रवेशापासून वंचित राहावे लागेल, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ मिळाल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत शिक्कामोर्तब झाले. येत्या शैक्षणिक वर्षापासून ‘बुद्धिझम अँड पाली’ हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. पीएच.डी., कोर्सवर्कचे वाढीव शुल्क कमी करण्यात आले. या बैठकीला कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव तुषार देशमुख, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख, अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी, अविनाश मोहरील, मनीषा काळे, डी. डब्लू. निचित यांच्यासह प्राचार्य, विद्वत परिषदेचे सद्स्य उपस्थित होते.
---------------------