अखेर ‘त्या’ बारमालकाविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:21 IST2021-05-05T04:21:13+5:302021-05-05T04:21:13+5:30
वरूड : बेनोडानजीकच्या लोणी फाट्यावरील एका बार रेस्टॉरंटमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या काही कर्मचारी व अधिकाऱ्यांनी रविवारी ...

अखेर ‘त्या’ बारमालकाविरूद्ध गुन्हा
वरूड : बेनोडानजीकच्या लोणी फाट्यावरील एका बार रेस्टॉरंटमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या काही कर्मचारी व अधिकाऱ्यांनी रविवारी ओली पार्टी केली. याबाबत प्रत्यक्षदर्शीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावर वरुड पोलिसांनी संबंधित बारमालकाविरूद्ध भादंविचे कलम १८८ नुसार गुन्हा दाखल केला. ओली पार्टी करणाऱ्या त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मात्र कारवाईपासून सवलत देण्यात आली. प्राप्त माहितीनुसार वरुड अमरावती रस्त्यावरील लोणी फाट्यावर एका बार रेस्टॉरंटमध्ये रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान आत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे काही अधिकारी व कर्मचारी ओली पार्टी करीत होते. संचारबंदी, जमाव बंदी तसेच लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवून ती पार्टी सुरु होती. हा प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता. ही बाब काहींनी वरूड पोलिसांच्या कानावर टाकली. पोलीस येताच तेथील सीसीटीव्हीचा डीव्हीआर पळविण्यात आला. ते ओली पार्टी करणारेदेखील तेथून वौनासह परांगदा झाले.
दरम्यान, प्रत्यक्षदर्शी नीलेश लोणकर यांनी याबाबत वरुड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. त्यानुसार बार मालकाविरूद्ध पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि संचारबंदीचे उल्लंघन झाल्याप्रकरणी कलम १८८ नुसार गुन्हा दाखल केला. मात्र, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कायद्याचे उल्लंघन केले असताना त्यांची मात्र साधी चौकशीदेखील करण्यात आली नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर तपासला नसून एकूण प्रकरणाबाबत शंका निर्माण झाली आहे.
कोट
संबंधित अधिकाऱ्यांचे बयान नोंदविले जाईल. त्या बार रेस्टाॅरंटच्या मालकाविरुद्ध कलम १८८ नुसार गुन्हा दाखल केला. बयान नोंदविल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
सुनील पाटील,
सहाय्यक पोलीस निरीक्षक
वरूड पोलीस ठाणे