अखेर यशोमती ठाकुरांच्या आंदोलनापुढे नमले शासन
By Admin | Updated: August 30, 2014 23:20 IST2014-08-30T23:20:13+5:302014-08-30T23:20:13+5:30
तिवसा विधानसभा मतदारसंघात सन २००७ पासून पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मुद्दा रेंगाळलेला होता. या मुद्द्यावर शनिवारी आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वातील शेकडो पूरग्रस्तांनी जिल्हाधिकारी

अखेर यशोमती ठाकुरांच्या आंदोलनापुढे नमले शासन
अमरावती : तिवसा विधानसभा मतदारसंघात सन २००७ पासून पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मुद्दा रेंगाळलेला होता. या मुद्द्यावर शनिवारी आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वातील शेकडो पूरग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ठिय्या मांडला. अखेर यशोमती ठाकूर यांच्या आंदोलनाची दखल थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तातडीने १० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. याबाबत लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयात आदेशही धडकलेत. आमदार यशोमती ठाकूर यांच्या अांदोलनाची फलश्रुती म्हणून पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मुद्दा निकाली निघाला. सन २००७मध्ये महापूर व अतिवृष्टीची झळ शेकडो कुटुंबियांना पोहचली होती.
पुनर्वसनासाठी २० कोटी द्या
वलगाव, रेवसा, देवरा, शिराळा, पुसदा, नांदुरा, देवरी, फाजलापूर, अंतोरा, सालोरा, टेंभा, गोपालपूर, कठोरा बु., कामुंजा, वझरखेड, थुगाव खानापूर, भातकुली तालुक्यातील धामोरी, तिवसा तालुक्यातील दुर्गवाडा आदी गावांतील पूरग्रस्तांचे तसेच पेढी बॅरेज प्रकल्पाअंतर्गत रोहणखेडा, पर्वतापूर, दनद, टेंभा या गावांतील लोकांचे पुनर्वसन शासनाने सन २००७ पासून अद्यापपर्यंतही केले नाही. परिणामी वरील गावांतील शेकडो कुटुंब आजही निवाऱ्याविना वास्तव्य करीत असल्याने पूरग्रस्त हक्काचे निवाऱ्यापासून वंचित आहेत. यासंदर्भात अनेकदा विविध प्रकारे आंदोलने केल्यानंतरही याची दखल शासन व प्रशासनाने घेतली नाही. परिणामी पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाकरिता तातडीने २० कोटी रुपयांची मंजुरी शासनाने देऊन पूरग्रस्तांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वातील पूरग्रस्तांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे रेटून धरली. जोपर्यंत या मागण्या निकाली काढणार नाही तोपर्यंत सभागृहातून हटणार नाही, असा इशारा ठाकूर यांनी दिला. त्यांची जिल्हाधिकारी गित्ते, निवासी उपजिल्हाधिकारी तेजुसिंह पवार, भूसंपादन अधिकारी मोहन पातुरकर यांनी समजूत काढल्यानंतरही त्या आपल्या मागणीवर ठाम होत्या. दरम्यान आंदोलनकऱ्यांनी सभागृहातच प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले. सभागृहातच झुणका भाकर खाऊन आंदोलन चालूच ठेवल्यामुळे प्रशासनासमोर प्रेचप्रसंग निर्माण झाला होता. सायंकाळी पाच वाजेपर्यत आंदोलन सुरूच होते . आमदार यशोमती ठाकूर यांच्या आंदोलनाची तीव्रता जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सातत्याने मंत्रालय स्तरावर कळविली. समस्येवर तोडगा काढण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्याना या आंदोलनाची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पुरग्रस्ताच्या पूनर्वसनासाठी त्वरीत १० कोटी रूपयाचा निधी मंजूर केला. आणि उर्वरीत १० कोटी रूपयांच्या निधीबाबत सोमवारी निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले. निधी मंजुरीचा लेखी आदेश आला. त्यानंतरच आमदार यशोमती ठाकूर यांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात आमदार यशोमती ठाकूर यांच्यासोबत ज्योती यावलीकर, हरीश मोरे, सुधीर उगले, गजानन देशमुख, शरद ठाकरे, श्याम बनसोड, राजेश ठाकरे, अनिल कडू, वीरेंद्र जाधव, अलकेश काळबांडे, प्रभाकर नांदणे, देवेंद्र देशमुख, हैदर शहा, कपिल वाघमारे, यांच्यासह शेकडो महिला पुरुषांचा समावेश होता. (प्रतिनिधी)