भयंकर
By Admin | Updated: July 28, 2014 23:15 IST2014-07-28T23:15:57+5:302014-07-28T23:15:57+5:30
जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत होता. पेरणी योग्य पाऊस बरसत असल्याने शेतकरी सुखावला होता. डोळ्यांमध्ये हिरवे स्वप्न रंगविणारा बळीराजा खुुशीत होता. रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत गावात शांतता होती.

भयंकर
गावकऱ्यांनीच वाचविले गाव
सचिन सुंदरकर, सुमित हरकुट/ब्राम्हणवाडा थडी
जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत होता. पेरणी योग्य पाऊस बरसत असल्याने शेतकरी सुखावला होता. डोळ्यांमध्ये हिरवे स्वप्न रंगविणारा बळीराजा खुुशीत होता. रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत गावात शांतता होती. काही वेळात येणाऱ्या प्रलयामुळे क्षणात होत्याचे नव्हते होईल, अशी कोणी कल्पनाही केली नव्हती. पाहता-पाहता पूर्णेने आक्राळ विक्राळ रूप धारण केले. डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच ब्राम्हणवाडा थडी जलमय झाले. ५०० घरे पत्त्यांच्या घरांप्रमाणे कोसळून पडली. शेकडोंचे संसार उद्धवस्त झाले. पावसाचा हा विध्वंसक धुमाकूळ सुरू असताना गावकऱ्यांनीच पुराच्या वेढ्यात सापडलेल्या शेकडो गावकऱ्यांचे प्राण वाचविले.
ब्राह्मणवाडा थडी आणि घाटलाडकीत रविवारी घडलेल्या प्रलयाच्या खाणाखुणा आजही कायम आहेत. क्षणात विनाश घडविणाऱ्या जलप्रलयासाठी जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित करून आता चर्चा झडतीलही. प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे ही भयंकर स्थिती उदभवली असे गावकरी उड बडवून सांगताहेत. पावसाने घातलेल्या धिंगाण्यामुळे त्यांच्या डोळ्यातील पाणीही आटले आहे.
‘लोकमत’प्रतिनिधीने पूरग्रस्त ब्राह्मणवाड्यात भेट देऊन आढावा घेतला असता तेथील दृष्य अत्यंत विदारक होते. काही प्रत्यक्षदर्शी गावकऱ्यांनी प्रलयंकारी परिस्थितीबाबत दिलेली माहिती अंगावर शहारे आणणारी होती.
पावसाने गिळले पुर्णेने हिरावले
चार दिवसांपूर्वीच्या अतिवृष्टीमुळे उदरनिर्वाहाचे साधन असलेले अवघे तीन एकर शेत खरडून निघाले. जिवन-मरणाचा सवाल डोळ्यांसमोर उभा ठाकला. यातून कसेबसे सावरण्याच्या प्रयत्नात असतानाच रविवारी पूर्णा कोपली आणि जगण्याचा आधार असलेला मुलगाही हिरावला गेला. पावसाच्या पाण्याने पीक गेले तर पूर्णेच्या विध्वंसाने पूत्र गमवावा लागला. ही कहाणी आहे ब्राह्मणवाडा थडी येथील गणेश वांगे यांची. तरणाताठा मुकबधिर मुलगा नदीच्या पूरात वाहून गेल्याने वांगे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
गणेश वांगे हे पत्नी दोन मुले, एका मुलीसह ब्राह्मणवाडा थडी येथे राहतात. तीन एकर शेतीच्या भरवशावरच त्यांच्या कुटुंबाची गुजराण होती. यंदा या तीन एकरात त्यांनी कपाशीचे बियाणे पेरले होते. त्यांचा स्वप्नील नामक १८ वर्षीय मुलगा कुरळ येथील पूर्णामाय मुकबधिर पुनर्वसन केंद्रात शिकत होता. शनिवारीच तो गावात आला. त्याची आई मेस चालविते. वडिलांची प्रकृती बरी नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील डबे पोहोचविण्याचा हट्ट धरला आणि तो डबे घेऊन निघाला. त्यावेळी त्याची आई छाया, बहिण कीर्ती आणि भाऊ अक्षय हे तिघेही घरीच होते.