स्त्रीलिंगी अर्भक पुरले जमिनीत
By Admin | Updated: July 11, 2016 00:03 IST2016-07-11T00:03:08+5:302016-07-11T00:03:08+5:30
वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारायणपुरात निर्दयतेचा कळस गाठणारी घटना शनिवारी उघडकीस आली.

स्त्रीलिंगी अर्भक पुरले जमिनीत
निर्दयी आई-वडिलांचा प्रताप : नारायणपूर येथील घटना
अमरावती : वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारायणपुरात निर्दयतेचा कळस गाठणारी घटना शनिवारी उघडकीस आली. अज्ञाताने आठ ते नऊ महिन्यांच्या स्त्रिलिंगी अर्भकाला जमिनीत पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणात वलगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला.
एकीकडे मुलींची संख्या वाढविण्यासाठी शासनास्तरावर प्रयत्न केले जात आहे. जनजागृती करून मुलींची हत्या थांबविण्याचे आवाहन शासनाने केले आहे. मात्र, आजही काही निर्दयी आई-वडिल आपल्या जन्मजात मुलींची हत्या करीत असल्याचे या घटनेवरून लक्षात येत आहे. नारायणपूर येथील रहिवासी सुधाकर पंजाब जुनघरे यांच्या मालकीच्या खुल्या जागेत शनिवारी काही श्वान स्त्रि अर्भकाचे लचके तोडत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले होते. या प्रकाराची माहिती नागरिकांनी पोलीस पाटील नितीन बबब तेलखेडे यांना दिली. त्यांनी घटनास्थळी जाऊन बघितले असता ८ ते ९ महिन्याचे स्त्री अर्भक हे अर्धा फूट जमीन खोदून पुरविण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र, त्या अर्भकाला श्वानाने बाहेर काढल्याचे आढळून आले. याबाबत त्यांनी तत्काळ वलगाव पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार वलगाव ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बाबील यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून नितीन तेलखडे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ३१८ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. अर्भकाचे इर्विन रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून सद्यस्थितीत ते मृत अर्भक शवगारात ठेवण्यात आलेले आहेत. पुढील चौकशी वलगाव पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)
सात ते आठ महिन्यांचे स्त्री अर्भक जमिनीत पुरल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात गावकऱ्यांची चौकशी सुरू आहे.
- एस.पी.सोनोने,
पोलीस निरीक्षक, वलगाव