कुपोषणग्रस्त जिल्ह्यातील पोषण आहार वाटपाची एफडीएमार्फत तपासणी व्हावी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 15:40 IST2025-07-15T15:39:14+5:302025-07-15T15:40:20+5:30
Amravati : आ. संजय खोडके यांनी वाढत्या कुपोषणाच्या परिस्थितीवर लक्षवेधी

FDA should inspect the distribution of nutritional food in malnutrition-affected districts
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कुपोषण निर्मूलनासाठी शासनाच्या अनेक योजना व उपाययोजना राबविल्या जात असताना स्थिती मात्र 'जैसे थे'च आहे. राज्यातील १४ कुपोषणग्रस्त तालुक्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा तालुक्याचा विचार केला तर राज्यातील १२ तालुक्यांच्या एकत्रित आकडेवारीपेक्षाही दुप्पट कुपोषण वाढ ही अमरावती जिल्ह्यात झालेली दिसून येते. या भीषण परिस्थितीकडे आ. संजय खोडके यांनी विधानपरिषदेतून शासनाचे लक्ष वेधले व उपाययोजना करण्याची सूचना केली.
अधिवेशनामध्ये सोमवारी सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सभागृहात कामकाजादरम्यान महिला व खाल विकाससंदर्भात सुरू असलेल्या लक्षवेधी चर्चेमध्ये आ. खोडके यांनी अमरावती भागातील कुपोषणाच्या या मुद्दयावर लक्ष वेधले. दरम्यानच्या काळात कुपोषणाच्या बाबतीत १४ समित्यांनी काम केले व सुधारणा करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, कुपोषणाची परिस्थित तशीच आहे. शासनाच्या आकडेवारीनुसार कुपोषणाची तीव्रता कमी झाली असली तरी मातामृत्यु, बालमृत्यू व कुपोषणाच्या बाबतीत प्रश्न अजूनही कायम असल्याचे सांगून आ. संजय खोडके यांनी कुपोषणाच्या उपाययोजनासंदर्भात अनेक शंका- कुशंका व्यक्त केल्या, प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा तालुक्यात कुपोषणसंदर्भात सभागृहाला अवगत करताना त्यांनी कुपोषणग्रस्त भागातील अंगणवाडी असो अथवा आरोग्य केंद्रामध्ये जो पोषण आहार पोहोचविला जातो, तो नियमित व वेळेवर पोहोचविण्यात येतो का? तो पोषण आहार सकस, चांगल्या पद्धतीचा व दर्जेदार असल्याची खात्री पटविण्यासाठी त्या आहाराची 'एफडीए'मार्फत नियमित तपासणी अथवा चौकशी करण्यात आली का? त्यावरून पोषण आहाराची गुणवत्ता कळणार असल्याचे सांगून आ. संजय खोडके यांनी प्रश्न उपस्थित केला.
आता फेस रिकगनाईस सिस्टम : अदिती तटकरे
ना. अदिती तटकरे यांनी कुपोषण भागात लाभार्थ्यांना आहार योजनेच्या लाभासाठी फेस रिकगनाईस सिस्टम सुरू केली आहे. आहार लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर सिस्टम्मच्या माध्यमातून तपासणी होत असून, या सिस्टमवर ७३ टक्क्यांवर काम पूर्ण झाले आहेत. अमरावतीच्या बाबतीत ज्या सूचना केल्यात त्यावर लक्ष केंद्रित करून अंतर्भाव करू, असे त्या म्हणाल्या.