‘एफडीए’ला फौजदारी कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2016 00:07 IST2016-06-30T00:07:58+5:302016-06-30T00:07:58+5:30

मंगळवारी पाच गोदामातून ९० लाख रुपयांचा पकडण्यात आलेल्या गुटखा प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासनाला फौजदारी कारवाईचे आदेश दिले आहेत.

FDA orders criminal action | ‘एफडीए’ला फौजदारी कारवाईचे आदेश

‘एफडीए’ला फौजदारी कारवाईचे आदेश

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : शहरातील गोदाम, ठोक विक्रे ते ‘टार्गेट’
अमरावती: मंगळवारी पाच गोदामातून ९० लाख रुपयांचा पकडण्यात आलेल्या गुटखा प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासनाला फौजदारी कारवाईचे आदेश दिले आहेत. जप्त करण्यात आलेला गुटखा नष्ट करण्यासाठी ‘एफडीए’ला निर्देश देखील देण्यात आले आहे. तसेच शहरातील गोदाम, थोक विक्रेते ‘टार्गेट’ केले जाणार आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असल्याचे वृत्त यापूर्वी ‘लोकमत’ने प्रकाशित केले. मात्र अन्न व औषध प्रशासनाचे गुटखा तस्करांशी साटेलोटे असल्यामुळे शहरात राजरोसपणे गुटखा विक्री सुरुच होती. दरम्यान आ. रवि राणा द्वारा स्थापित युवा स्वाभीमान संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन वजा गुटख्याचे फर्रे देऊन गुटखा विक्री होत असल्याचे स्पष्ट केले होते. मंगळवारी काही नागरिक जिल्हाधिकारी गित्ते यांना भेटले. शहरात कोणत्या स्थळी, गोदाम, प्रतिष्ठानांमध्ये गुटखा विक्री केली जाते, हे रेखाचित्राद्वारे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यानुसार मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागाला गुटखा विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश दिले. त्याकरिता तीन पथके स्थापन करण्यात आले होते. तहसीलदार सुरेश बगळे, एफडीएचे सहायक आयुक्त मिलिंद देशपांडे यांनी स्थानिक जाफरजीनप्लॉट स्थित अग्रवाल टॉवरमधील पाच गोदामांवर धाडसत्र राबवून बाजारमूल्यानुसार ९० लाख रुपयांचा गुटखा ताब्यात घेतला. पाच गोदामांवर धाडसत्र राबविले असले तरी शहरात अन्य गोदामांवर जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष केले आहे. तसेच गुटखा विक्री करणारे थोक विक्रेत्यांना लवकरच गजाआड करण्याची तयारी जिल्हाधिकाऱ्यांनी चालविली आहे. ९० लाख रुपयांचा गुटखा पकडण्यात आल्याप्रकरणी संतोष मंगलानी, अशोक बसंतवानी यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाणार आहे. गुटखा तस्करी प्रकरणी कोणाचाही मुलाहिजा करणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तर दुसरीकडे महसूल विभागाला गुटखा विक्री रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा लागल्यामुळे एफडीए संशयाच्या भोवऱ्यात आला आहे. शहरात छोटया-मोठया पानठेल्यांवर अवैध गुटखा विक्री होत असल्याचे चित्र असताना अन्न, औषध प्रशासन ठोस कारवाई का करीत नाही, यामागे बरेच काही दडले असल्याचे बोलले जात आहे. मंगळवारच्या एका कारवाईत ९० लाख रुपयांचा गुटखा पकडला जाणे ही बाब एफडीएसाठी नामुष्कीची मानली जात आहे. (प्रतिनिधी)

जिल्हाधिकाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव
अवैध गुटखा विक्री रोखण्याची जबाबदारी राज्य शासनाने अन्न व औषध प्रशासनावर सोपविली असताना मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने महसूल विभागाने ९० लाख रुपयांचा गुटखा ताब्यात घेतला. ज्या गोदामातून गुटखा ताब्यात घेण्यात आला त्या घटनास्थळी स्वत: जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी भेट देवून वस्तुस्थिती जाणून घेतली. कारवाईस्थळी एफडीएच्या अधिकाऱ्यांना जाण्याचे निर्देश दिले. गुटखा विक्री रोखण्यासाठी जिल्हाधिकारी गित्ते यांनी घेतलेल्या धाडसी पावलांचे सर्वसामान्यांकडून कौतूक केले जात आहे.

मध्यप्रदेशातून गुटखा येत असल्याचा दाट संशय
शहरात मोठया प्रमाणात गुटखा हा मध्यप्रदेशातून येत असल्याचा दाट संशय जिल्हा प्रशासनाला आहे. गुटख्याची तस्करी रोखणे हे आव्हान असले तरी जिल्हा प्रशासनाने शहरातील साठवणूक करणारे गोदाम, ठोक विक्रेत्यांना लक्ष केले आहे. वलगाव मार्गालगतचा गोदामात मोठया प्रमाणात गुटखा साठवून ठेवण्यात आल्याची विश्वसनीय माहिती महसूल विभागाच्या हाती लागली आहे. तसेच मुस्लिम बहूल भागातही गुटख्याचे गोदाम असल्याचे बोलले जात आहे. गुटखा तस्करीत काही विशिष्ट व्यक्ती समाविष्ट असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

शास्त्रीयदृष्ट्या केला जाणार गुटखा नष्ट
पाच गोदामातून ताब्यात घेण्यात आलेला ९० लाख रुपयांचा गुटखा शास्त्रीयदृट्या नष्ट केला जाणार असल्याचा निर्णय जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी घेतला आहे. गुटखा विक्रेत्यांवर कारवाई झाल्यानंतर गुटखा कोठे जाते? याबाबत संभ्रम असते. मात्र मंगळवारी महसूल विभागाच्या पुढाकाराने कारवाई करुन जप्त केलेला गुटखा शास्त्रीयदृष्ट्या नष्ट करु, अशी भूमिका जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी घेतली आहे. इन कॅमेरा गुटखा नष्ट करण्यावर प्रशासनाचा भर राहील, असे संकेत आहेत.

Web Title: FDA orders criminal action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.