कबुतरासाठी पक्षिप्रेमींनी लावली जिवाची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 06:01 IST2020-01-26T06:00:00+5:302020-01-26T06:01:29+5:30
चंदननगर चौकातील हायमास्ट दिव्याच्या खांबावर नायलॉन मांजामध्ये कबुतर अडकले होते. तेथून ये-जा करणारे नागरिक कबुतराला पाहत होते. मात्र, त्याच्याकरिता ते काहीही करू शकत नव्हते. अखेर या घटनेची माहिती सायंकाळी एका पक्षिप्रेमी तरुणीने सर्पमित्र अविनाश येते यांना दिली. त्यांनी वसा संस्थेच्या हेल्पलाइनवर संपर्क साधला.

कबुतरासाठी पक्षिप्रेमींनी लावली जिवाची बाजी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अकोली रोडवरील चंदननगर येथे विजेच्या खांबावरील नायलॉन मांजात अडकलेल्या कबुतराला पक्षिप्रेमींनी जिवाची पर्वा न करता वाचविले. वसा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अग्निशमन विभागाच्या मदतीने शुक्रवारी सायंकाळी हायमास्ट दिव्याच्या खांबावरून कबूतरला मांजातून सुखरूप बाहेर काढले.
चंदननगर चौकातील हायमास्ट दिव्याच्या खांबावर नायलॉन मांजामध्ये कबुतर अडकले होते. तेथून ये-जा करणारे नागरिक कबुतराला पाहत होते. मात्र, त्याच्याकरिता ते काहीही करू शकत नव्हते. अखेर या घटनेची माहिती सायंकाळी एका पक्षिप्रेमी तरुणीने सर्पमित्र अविनाश येते यांना दिली. त्यांनी वसा संस्थेच्या हेल्पलाइनवर संपर्क साधला. या माहितीवरून अॅनिमल्स रेस्क्यूअर भूषण सायंके, निखिल फुटाणे, सहायक पशुचिकित्सक गणेश अकर्ते आणि शुभम सायंके हे सर्र्व साहित्य घेऊन चंदननगरात पोहोचले. तेथे मदतीसाठी नागरिक मंगेश सेवतकर आणि प्रशांत जाधव धावून आले.
रात्रीच्या अंधारात वीजप्रवाह सुरू असलेल्या विजेच्या खांबावर चढणे धोकादायक होते. त्यातच कबुतर प्रखर प्रकाश देणाºया हायमास्ट दिव्याच्या वरच्या बाजूला उलटे लटकून होते. त्याला वाचविणेही कठीण होते. त्यामुळे सहायक पशुचिकित्सक गणेश अकर्ते यांच्या मदतीने शुभम सायंके यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना मदतीसाठी बोलाविले. अग्निशमनच्या मदतीने पक्ष्याचे रेस्क्यू करण्याचे ठरले. मात्र, लावलेली शिडी आखूड होती. त्यातच तेथे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अखेर भूषण सायंके यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सेल्फ हँगिंग मेथडचा उपयोग घेऊन मांजात अडकलेल्या कबुरतराला सोडविण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांना निखिल फुटाणे, गणेश अकर्ते आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी खालून आधार दिला. त्यानंतर भूषणने एका दोरावर लटकून मांजा कापला आणि कबुतरला मुक्त केले. उपचारानंतर त्या कबुतराला रेस्क्यू केलेल्या ठिकाणा नजीक मुक्त करण्यात येणार असल्याची माहिती वसाचे शुभम सायंके यांनी दिली.
नायलॉन मांजाचा वापर न करण्याचे आवाहन यानिमित्त वसा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
११ पक्षी पतंगीच्या मांजात अडकल्याची नोंद
डिसेंबर आणि जानेवारीत वसा रेस्क्यू टीम मांजात अडकलेल्या पक्ष्यांची आणि मांजाने जखमी झालेल्या पक्ष्याच्या नोंदी घेतल्या आहेत. प्रामुख्याने शिकारी पक्षी घुबड आणि त्यानंतर मिश्रहारी पक्षी कबुतर, हरियल, स्थानिक स्थलांतरित पक्षी उघडचोच करकोचा यांना नायलॉन मांजाचा चांगलाच फटका बसल्याची माहिती वसाचे गणेश अकर्ते यांनी दिली.