वडील सुरक्षारक्षक, आई मोलकरीण मुलीला बनायचं आयपीएस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 14:44 IST2025-05-06T14:26:15+5:302025-05-06T14:44:41+5:30
Amravati : विद्याभारती महाविद्यालयातील तनिष्काने कला शाखेत मिळविले ९१.५० टक्के गुण

Father is a security guard, mother is a maid, daughter wants to become IPS
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : घरची परिस्थिती बेताची, संसाराचा गाडा सुरळीत चालावा म्हणून वडिल सुरक्षारक्षक तर आई मोलकरीण म्हणून घरकाम करते. अशाही परिस्थितीवर मात करत तनिष्का विशाल मसराम या विद्यार्थिनीने बारावीत कला शाखेतून ९१.५० टक्के गुण मिळविले आहेत. लहानपणापासूनच आयपीएस होण्याचे स्वप्न उराशी बाळगल्याने दहावीमध्ये ८४.६० टक्के गुण असतानादेखील कला शाखा निवडल्याचे तनिष्काने 'लोकमत'ला सांगितले. मुलांच्या भविष्यासाठी पालक जिवाचे रान करतात. आणि पालकांच्या कष्टाची जाणीव ठेवत काही मुलं पालकांचे नाव मोठे करतात. तनिष्काने बारावीत मिळविलेले यशदेखील तसेच आहे. आदिवासी नगर या झोपडपट्टीबहुल भागात राहणारे तनिष्काचे वडील विशाल मसराम हे विभागीय संदर्भसेवा रुग्णालय येथे दहा वर्षांपासून सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. तर आई सुरेखा यादेखील इतरांच्या घरी धुणीभांडी करून आपल्या गरीब संसाराचा गाडा ओढत आहेत.
पोरीच्या यशामुळे आई-वडिलांना आनंदाश्रू
आमची घरची परिस्थिती गरिबीची पोरीने मोठ्या जिहीने अभ्यास केला. पोरगी आमचं एवढं मोठे नाव करेल असं वाटलं नव्हतं. आज बारावीमध्ये तिला मिळालेल्या यशामध्ये तिचेच कष्ट आहेत. रोज सकाळी ३ वाजता उठून ती अभ्यास करायची असे तनिष्काचे गोडवे गाताना आई सुरेखा आणि वडिलांनी विशाल यांनी आपल्या आनंदाश्रूला वाट मोकळी करून दिली. तनिष्काला एक लहान बहीण तनवी आहे. तिनेदेखील यंदा दहावीची परीक्षा दिली आहे.
२२ व्या वर्षी आयपीएस झालेले सफीन हसन आदर्श
२२ व्या वर्षी आयपीएस झालेल्या सफीन हसन यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तनिष्काने दहावीमध्येच आयपीएस होण्याचा निर्धार केला. हसन यांनी गरिबीतून ते यश गाठले होते. दहावीत ८४.६० टक्के गुण मिळाल्यानंतरही तनिष्काने विज्ञान शाखेकडे न जाता आर्टस निवडले.