अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
By उज्वल भालेकर | Updated: April 25, 2025 20:18 IST2025-04-25T19:54:48+5:302025-04-25T20:18:04+5:30
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे २०१८ पासून किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरु करण्यात आली आहे

अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
उज्वल भालेकर/अमरावती : बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयातही अनेक गंभीर आजार पहायला मिळत आहे. एका १५ वर्षीय मुलीची किडनी फेल झाल्याने बापाच्या काळजाचा पाझर फुटला. आपल्या मुलींच्या पुढील आयुष्यासाठी बापाने आपली एक किडनी दान करत तिला नवे जीवनदान दिले आहे. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे शुक्रवारीही किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे.
अमरावती येथील रहिवासी असलेली जानवी हरेश वैद्य (१५) ही मागील तीन महिन्यापासून किडनी आजाराने त्रस्त होती. त्यामुळे तिच्यावर डायलिसिस उपचार सुरु होते. कमी वयात तिला किडनीचा आजार झाल्याने तिच्या पुढील दीर्घकालीन आयुष्यासाठी किडनी प्रत्यारोपण हाच योग्य पर्याय असल्याची माहिती डॉक्टरांनी तिच्या वडीलांना दिली. तसेच डायलिसिस दरम्यान मुलीला होणारा त्रास लक्षात घेता लेकीसाठी वडील हरीश महादेवराव वैद्य (४८) यांच्या काळजाला पाझर फुटला आणि त्यांनी आपली एक किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नेफरोलॉजिस्ट डॉ. प्रणित काकडे, डॉ.नयन काकडे, युरो सर्जन डॉ.राहुल पोटोडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. राहुल घुले, डॉ. विशाल बाहेकर, बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. रोहित हातगावकर, डॉ. बाळकृष्ण बागवाले , डॉ. शितल सोळंके, डॉ. अश्विनी मडावी, डॉ. अंजू दामोदर, डॉ. विक्रांत कुळमेथे, डॉ. जयश्री पुसदेकर, डॉ. नाहीद, डॉ. उज्वल अभ्यंकर, डॉ. प्रियंका कांबळे यांनी ही किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली. अमरावती विभागात कमी वयातील किडनी प्रत्यारोपणाची ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
रुग्णालयातील ५२ वी शस्त्रक्रिया
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे २०१८ पासून किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरु करण्यात आली. मार्च २०२५ पर्यंत याठिकाणी ५१ किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागातील किडनी प्रत्यारोपण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल जागतिक आरोग्य दिनानिमित्त सुपरला प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. अशातचा आता रुग्णालयातील ५२ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया देखील यशस्वी करण्यात आली आहे.