वलगाव येथील शेतकर्यांची जिल्हा कचेरीवर धडक
By Admin | Updated: May 18, 2014 23:14 IST2014-05-18T23:14:53+5:302014-05-18T23:14:53+5:30
अमरावती : मौजा वलगाव शेत शिवारात नांदगाव पेठ येथील पॉवर ट्रान्समिशन कंपनीने मनोर्यावर तारा टाकून शेतजमिनीवर पसरविल्या आहेत. यामुळे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेती कामे

वलगाव येथील शेतकर्यांची जिल्हा कचेरीवर धडक
अमरावती : मौजा वलगाव शेत शिवारात नांदगाव पेठ येथील पॉवर ट्रान्समिशन कंपनीने मनोर्यावर तारा टाकून शेतजमिनीवर पसरविल्या आहेत. यामुळे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेती कामे करण्यास अडथळा निर्माण होेत आहे. याशिवाय नुकसान भरपाई दिली नसल्याने शनिवारी अन्यायग्रस्त शेतकर्यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. पॉवर ट्रान्समिशन कंपनीच्या वतीने मौजा वलगाव शेतशिवारात वीज वाहिनी टाकण्यासाठी मनोर्यावर वीज तारा टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी विविध शेतकर्यांच्या शेतात वीज तारा पसरवून ठेवल्या असल्याने शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. याशिवाय खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतात मशागतीची कामे करण्यास शेतकर्यांना अडथळा निर्माण होत आहे. तसेच मनोर्यासाठी शेतकर्यांच्या शेतातील जागा सदर कंपनीने घेतली. यापोटी प्रत्येकी ५० हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचे कंपनीने मान्य केले; मात्र अद्यापही भरपाई मिळाली नाही. त्यामुळे शेतकर्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतरही अमरावती पॉवर ट्रान्समिशन कंपनीने शेतकर्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई दिली नाही. तसेच शेतात अडथळा निर्माण होत असल्याने पसरविलेल्या तारा काढून टाकाव्यात, अशी मागणी वलगाव येथील शेतकर्यांनी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी अंकुश कल्हाने, प्रफुल्ल वसू, अब्दुल रशिद, वसंत घाटोळ, सुधीर निर्मळ, मनुबाई बोबडे, ज्ञानेश्वर निर्मळ, वच्छला सोळंके, आनंद ढगे, नंदकिशोर पुरीकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)