अमरावती-यवतमाळ मार्गावर शेतकऱ्यांचे रस्तारोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2017 00:15 IST2017-02-28T00:15:50+5:302017-02-28T00:15:50+5:30
गेल्या काही दिवसांपासून नाफेडने तूर खरेदी बंद केल्यामुळे व्यापाऱ्यांनी तुरीचे भाव पाडले व तुरीला भाव मिळत नसल्यामुळे सोमवारी शेकडो शेतकरी रस्त्यावर आले ...

अमरावती-यवतमाळ मार्गावर शेतकऱ्यांचे रस्तारोको आंदोलन
नाफेडची खरेदी बंद : व्यापाऱ्यांनी तुरीचे भाव पाडले
नांदगाव खंडेश्वर : गेल्या काही दिवसांपासून नाफेडने तूर खरेदी बंद केल्यामुळे व्यापाऱ्यांनी तुरीचे भाव पाडले व तुरीला भाव मिळत नसल्यामुळे सोमवारी शेकडो शेतकरी रस्त्यावर आले व त्यांनी अमरावती यवतमाळ मार्गावर रास्तारोको आंदोलन केले.
तुरीला ५०५० हमीभाव असताना नाफेडने गोडाऊनमध्ये तूर ठेवण्यासाठी जागा नसल्याची सबब दर्शवून खरेदी बंद केली. त्याचा विपरित परिणाम होऊन व्यापाऱ्यांनी अत्यंत कमी दरारत तूर खरेदी सुरू केली. त्यामुळे शेतकरी संतप्त होऊन रस्त्यावर उतरले व त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर अमरावती-यवतमाळ मार्गावर चक्काजाम करून वाहतूक काही काळ ठप्प केली, घोषणा दिल्या. ही बाब तहसीलदार बी.व्ही. वाहूरवाघ यांना कळताच ते घटनास्थळी पोहोचले व त्यांनी वेअर हाऊसचे अधिकारी व जिल्हा उपनिबंधक, तालुका उपनिबंधक तसेच नाफेडचे अधिकारी यांच्यासोबत दूरध्वनीवरून संपर्क साधला. अधिकाऱ्याला गोडाऊन भाड्याने घेण्यास सुचविले. सोमवारी बाजारात विक्रीस आलेल्या तुरीच्या मालाचा खरेदीचा प्रश्न निर्माण झाला होता. एकीकडे नाफेडची खरेदी बंद व दुसरीकडे व्यापाऱ्यांकडून मिळणारा कमी भाव शेतकऱ्यांना परवडणारा नसल्यामुळे हा माल पडून होता.
शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी तहसीलदार सहायक निबंधक पालटकर यांनी व्यापाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर व्यापाऱ्यांनी हा माल ३८०० व ४२०० रुपयांनी खरेदी करण्याची सहमती दर्शविली. यावेळी शेतकऱ्यांनी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. (प्रतिनिधी)