शेतकऱ्यांसाठी जेव्हा सरकार कमी पडते तेव्हा सहकार पाठीशी उभा राहतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:14 IST2021-09-19T04:14:36+5:302021-09-19T04:14:36+5:30
बच्चू कडू : संत गाडगेबाबा शेतकरी व्यापारी संकुलाच्या ८० गाळ्यांचे उद्घाटन फोटो कॅप्शन अचलपुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन ...

शेतकऱ्यांसाठी जेव्हा सरकार कमी पडते तेव्हा सहकार पाठीशी उभा राहतो
बच्चू कडू : संत गाडगेबाबा शेतकरी व्यापारी संकुलाच्या ८० गाळ्यांचे उद्घाटन
फोटो कॅप्शन अचलपुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन संत गाडगेबाबा व्यापारी संकुलाचे उद्घाटनाच्या वेळी राज्यमंत्री बच्चू कडू,आ पटेल
परतवाडा : देशात सहकार क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतकऱ्यांसाठी ही हक्काची बाजारपेठ आहे आणि शेतकरी हितासाठी जेव्हा सरकार कमी पडते तेव्हा त्यांच्या पाठीशी सहकारक्षेत्र उभे ठाकते, असे प्रतिपादन राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले. अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीत नव्याने तयार करण्यात आलेल्या संत गाडगेबाबा शेतकरी व्यापारी संकुलाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
‘अ’ श्रेणीचा दर्जा प्राप्त असलेल्या अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीने तयार केलेल्या नवीन दुकानांच्या चाव्या यावेळी शेतकरी व्यापाऱ्यांना प्रदान करण्यात आल्या. याप्रसंगी मंचावर मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, बाजार समिती सभापती अजय पाटील टवलारकर, उपसभापती गोपाल लहाने, संचालक विजय काळे, बाबूराव गावंडे, गजानन भोरे, अमोल चिमोटे, दीपक पाटील टवलारकर, वर्षा पवित्रकार, किरण शेळके, गंगाधरराव चौधरी, गंगाधर काळे, राजेंद्र गोरले, शिवराज काळे, आनंद गायकवाड, सतीश व्यास, महादेव घोडेराव, किरण मालू, बाजार समितीचे सचिव पवन सार्वे उपस्थित होते. संचालन बाजार समितीचे माजी सचिव आडके यांनी केले. पाहुण्यांचे आभार संचालक सतीश व्यास यांनी मानले.
बॉक्स
आदिवासींची पिळवणूक थांबली - राजकुमार पटेल
चिखलदरा व धारणी तालुक्यात कृषिउत्पन्न बाजार समिती सर्व सोयीयुक्त नसल्याने आदिवासींना हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. परंतु, अचलपूर बाजार समितीने त्यांचा त्रास फार प्रमाणात कमी केला. त्यांच्या शेतमालाला भाव तर मिळालाच, बाजार समितीत निवास व भोजनाची सोयही झाली. अन्य ठिकाणी अशी कुठलीही व्यवस्था नाही, असे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी सांगितले.