नापिकीच्या पैशांसाठी शेतकरी आक्रमक
By Admin | Updated: March 13, 2015 00:15 IST2015-03-13T00:15:49+5:302015-03-13T00:15:49+5:30
परिसरातील शेतकऱ्यांना नापिकीचा मोबदला मिळाला नाही. शेकडो शेतकरी नापिकीच्या लाभापासून वंचित राहिलेत.

नापिकीच्या पैशांसाठी शेतकरी आक्रमक
सावरखेड : परिसरातील शेतकऱ्यांना नापिकीचा मोबदला मिळाला नाही. शेकडो शेतकरी नापिकीच्या लाभापासून वंचित राहिलेत. शेतकऱ्यांचा बँकेचे चुकीचे खाते क्रमांक महसूल प्रशासनाकडून पाठविल्यामुळे त्यांचे पैसे तीन वेळा परत गेले. ही चूक तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केल्यामुळे शेतकऱ्यांना नापिकीचा लाभ मिळाला नाही. शेतकऱ्यांना त्वरित लाभाची रक्कम मिळावी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचे निराकरण शासनाकडून केला जावा अन्यथा तहसीलवर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा संबंधित शेतकऱ्यांनी दिला आहे.
सन २०१२-१३मध्ये नापिकीची स्थिती होती. त्यावेळी राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. शासनाकडून केलेल्या सर्वेक्षणानुसार नापिकीग्रस्त शेतकऱ्यांची यादी बनविण्यात आली. शेतकऱ्यांचे बँक खाते क्र. संबंधित तलाठ्यांकडे देण्यास सांगितले. तलाठ्यांनी शेतकऱ्यांच्या यादीसह बँक खाते क्रमांक तहसील कार्यालय मोर्शी येथे सादर केली. काही शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या करुन तहसील कार्यालयाकडून बँकेकडे पाठविण्यात आल्या. या यादीमध्ये शेकडो शेतकऱ्यांचे बँकेचे खाते क्रमांक चुकीच्या पद्धतीने पाठविण्यात आल्याने त्यांचे पैसे खात्यात जमा न होता परत गेले, अशी चर्चा आहे. ही चूक सुधारावी व शासनाने देऊ केलेली रक्कम आपल्या खात्यात जमा व्हावी, यासाठी संबंधित शेतकरी शासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजवित आहेत.
५० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांकात बदल दिसून आला. दुरुस्तीकरिता पुन्हा खाते क्रमांक मागविण्यात आले. पुन्हा तोच घोळ झाल्याने नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित राहिले. त्यांना लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आता ओरड सुरु केली आहे. एक वर्षापासून शेतकरी तहसीलकडे तक्रारी व चकरा मारीत आहेत.
परिसरातील नेरपिंगळाई, कमळापूर, राजूरवाडी, सिरलस, लिहिदा या भागातील शेतकऱ्यांना याचा चांगला फटका बसला आहे. नेरपिंगळाई भाग १ व भाग २ मधील शेतकऱ्यांचा सर्वाधिक घोळ झाला. याचे तीन वेळा पैसे परत गेल्याची माहिती आहे. नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकरी कंटाळले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी होत आहे. एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्याकडे कामाचा भार येत असल्याने हा घोळ आपल्या कारकिर्दीत झाला नाही. म्हणून दुर्लक्ष करीत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. झालेल्या घोळाला जबाबदार कोण असा प्रश्न शेतकरी विचारित आहे. सिरलस, राजुरवाडी, कमळापूर, नेरपिंगळाई, लिहिदा येथील शेतकऱ्यांना झळ बसली आहे. शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास तहसील कार्यालयावर ठिया आंदोलन करण्याचे शेतकऱ्यांनी निर्णय गेतला आहे. भाजपा नेरपिंगळाई शाखाध्यक्ष अनिल फंदे यांच्या सह शेकडो शेतकरी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला संबंधित प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनाद्वारे हा इशारा दिला असून या निवेदनात ४५ पीडित शेतकऱ्यांचा समावेश आहे.