तहसीलदारांच्या दालनात शेतकऱ्याने घेतला विषाचा घोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:10 IST2021-06-29T04:10:26+5:302021-06-29T04:10:26+5:30
फोटो पी २८ चांदूर बाजार फार्मर चांदूर बाजार : तालुक्यातील मौजे बेलोरामधील वडिलोपार्जित शेतीतून वहिवाटीकरिता तात्पुरता शीव रस्ता मिळत ...

तहसीलदारांच्या दालनात शेतकऱ्याने घेतला विषाचा घोट
फोटो पी २८ चांदूर बाजार फार्मर
चांदूर बाजार : तालुक्यातील मौजे बेलोरामधील वडिलोपार्जित शेतीतून वहिवाटीकरिता तात्पुरता शीव रस्ता मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याने नायब तहसीलदारांच्या दालनात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे महसूल विभाग चांगलाच हादरून गेला होता. येथील तहसील कायार्लयात सोमवारी दुपारी १ ते १.३० च्या सुमारास हा थरार घडला. सचिन रामेश्वर वाटाणे (४०, रा. गजानननगर, चांदूर बाजार) असे शेतकऱ्याचे नाव आहे.
सचिन वाटाणे यांची मौजे बेलोरा सर्व्हे क्रमांक १६७/२२ मध्ये १ हेक्टर ७९ आर शेती आहे. सदर शेती ही वडिलोपार्जित असून, आजपर्यंत शेताची वहिवाट याच रस्त्याने होत आली आहे. मात्र, रमेश शंकसाथ चुळे व सुरेश शंकरराव धुळे यांनी सदर शेताचा रस्ता ताराचे कुंपण घालून बंद केला. सचिन वाटणे यांनी २२ मे रोजी तहसील कार्यालयात रस्ता मिळण्याबाबत अर्ज केला होता. तथापि, राजकीय दबावामुळे आजपर्यंत कसल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही, असा आरोपही शेतकऱ्याने वारंवार दिलेल्या तक्रारीत केला आहे.
अखेर सोमवारी दुपारी १ वाजता शेतकरी सचिन वाटाणे यांनी तहसीलदार देवेंद्र सवई यांच्या दालनात दाखल होऊन कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी तहसील कार्यालयात एकच खळबळ माजली. अखेर उपस्थित कर्मचारी व नागरिकांनी सचिन वाटाणे यांना तहसीलदारांच्या शासकीय वाहनातून स्थानिक ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथून पुढील उपचाराकरिता त्यांना अमरावती येथे हलविण्यात आले. शेतकऱ्याने विष प्राशन केल्यानंतर काही वेळ एकाही कर्मचाऱ्याने वाटाणे यांना हातदेखील लावला नसल्याचा आरोप लोकविकास संघटनेचे अध्यक्ष गोपाल भालेराव यांनी केला आहे.