शेतक-याने उभ्या कपाशीतच फिरविला ट्रॅक्टर, धामणगाव तालुक्यातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 16:36 IST2018-08-13T16:36:10+5:302018-08-13T16:36:23+5:30
बोंडअळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादन होणे नाही, याची खात्री करून तालुक्यातील निंबोली येथील एका शेतक-याने दोन एकरातील डौलात असलेल्या कपाशी पिकावर रविवारी ट्रॅक्टर फिरविला.

शेतक-याने उभ्या कपाशीतच फिरविला ट्रॅक्टर, धामणगाव तालुक्यातील प्रकार
- मोहन राऊत
धामणगाव रेल्वे (अमरावती) : बोंडअळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादन होणे नाही, याची खात्री करून तालुक्यातील निंबोली येथील एका शेतक-याने दोन एकरातील डौलात असलेल्या कपाशी पिकावर रविवारी ट्रॅक्टर फिरविला.
तालुक्यातील शेतकरी पूर्वी कपाशीऐवजी सोयाबीन पिकाची शेती करायचे. मात्र, काही वर्षांपासून सोयाबीन उत्पादनात प्रचंड घट झाली. जेमतेम हाती आलेल्या शेतमालाला शासनदरबारी योग्य भाव मिळत नसल्याने शेतक-यांनी सोयाबीन उत्पादनाकडे पाठ फिरवीत कपाशी लागवडीकडे वळले. मात्र, या पिकांवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतक-यांवर उभे पीक उपटण्याची वेळ आली आहे. सध्या कपाशी पीक फुल-पात्यांसह लहान-लहान बोंडावर आहे. त्यातच बोंडअळीचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे प्रत्येक झाडाचे निरीक्षणांती दिसून आले. बोंडअळी हा प्रकार सहजरीत्या नष्ट होत नसल्याचे मागील वर्षीचे अनुभव पाहता ते परिसरातील पीक नष्ट करणार, हे शतप्रतिशत खात्री झाल्याने निंबोली भोंगे येथील शेतकरी अरविंद विठोबाजी सोनोने तीन एकरांतील बोंडअळी बाधित कपाशी छटकभरही कापूस घरी आले नसताना पूर्णत: पीकच ट्रॅक्टरने मोडून काढले. कारण त्याच तीन एकराच्या आजूबाजूला त्याचीच दोन एकर लागवणने केलेली शेती असून, त्यातही कपाशी पीक बहरले आहे. अशा शेतकºयांनी शेतात फेरोमोन ट्रॅप लावावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. येथील बोंडअळी बाजूच्या शेतात जाण्याच्या भीतीने त्याने तीन एकरातील बोंडअळी बाधित संपूर्ण पीकच रविवारी ट्रॅक्टरच्या सहाय्याने दोन एकराती पºहाटी उपटून ते वाळवून जाळण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते 'लोकमत'शी बोलताना म्हणाले.
बीजी-३ ची परवानगी दिल्यास शेतकºयांचे नुकसान टळणार
शासनाने बीटी बियाण्यात बीजी-२ परवानगी दिली आहे. मात्र, बीजी-२ हे निकामी झाल्याचे पत्र मोन्सॅन्टो कंपनीने शासनाला दिले असून, बीजी-३ ची परवानगी मागितली होती. ती मिळाल्यास शेतकºयांचे नुकसान टळणार होते. मात्र, शासनाने ती नाकारली. कारण बीजी-३ ची परवानगी दिल्यास पर्यावरणाला त्यापासून धोका निर्माण होण्याचे संकेत आहे.
कपाशी लागवडीचा ४५ हजार रुपये खर्च
अरविंद सोनोने यांनी तीन एकरात केलेल्या कपाशी लागवडीसाठी ४५ हजार रुपये खर्च केले. कपाशीवर बोंडअळीने आक्रमण केल्यामुळे ट्रॅक्टर फिरविले. यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
तालुक्यातील प्रत्येक गावात बोंडअळीवर उपाययोजनेसाठी शेतकºयांची कार्यशाळा घेतली. शेतकºयांना कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात आले. बोंडअळीग्रस्त भागातील शेतकºयांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा.
- अजय तळेगावकर, तालुका कृषी अधिकारी
गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात बोंडअळी पडली. १० डिसेंबरपर्यंत तीन एकरात २७ क्विंटल कापूस घरी आले. त्यानंतरही प्रत्येक झाडाला ५० ते ६० बोंडे होती. मात्र, प्रकोपामुळे बोंडे किडल्याने किलोभरही कापूस आला नाही. अखेर पूर्ण पीक मोडीत काढले. यावर्षीही तीच स्थिती दिसून आल्याने इतरही शेतातील पीक बाधित होऊ नये, यासाठी बोंडअळीबाधित कपाशी पीक मी त्वरेने नष्ट करण्याचा निर्णय घेतला.
- अरविंद सोनोने, शेतकरी निंबोली