भाडे निश्चित, १ रुपयाऐवजी ६० रुपये
By Admin | Updated: May 24, 2017 00:06 IST2017-05-24T00:06:29+5:302017-05-24T00:06:29+5:30
स्थानिक प्रियदर्शिनी आणि जवाहर गेटस्थित खत्री संकुलातील नियमानुकूल दुकानांकडून रेडीरेकनर दराने भाडेआकारणी केली जाणार आहे.

भाडे निश्चित, १ रुपयाऐवजी ६० रुपये
स्थायी समितीचा निर्णय : अनधिकृत करारनामे रद्द, आयुक्त ठाम, व्यापाऱ्यांमध्ये असंतोष
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक प्रियदर्शिनी आणि जवाहर गेटस्थित खत्री संकुलातील नियमानुकूल दुकानांकडून रेडीरेकनर दराने भाडेआकारणी केली जाणार आहे. प्रशासनाने दिलेला दीडपटीचा प्रस्ताव नाकारत स्थायी समितीने प्रियदर्शिनी संकुलातील नियमानुकूल दुकानांना प्रतिमहिना ६० रूपये प्रतिचौरस फुट आणि जवाहरगेट संकुलातील गाळ्याचे भाडे ६१ रूपये प्रतिचौरस फुट निश्चित करण्यात आले. मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाच्या प्रस्तावावर सांगोपांग चर्चा झाल्यानंतर सभापती तुषार भारतीय यांनी प्रशासनाने दिलेल्या रेडीरेकनर दरावर मंजुरीचे शिक्कामोर्तब केले.
व्यापाऱ्यांची बाजू घेणाऱ्यांचा हिरमोड
अमरावती : तत्पुर्वी मंगळवारी सकाळी ११ वाजता प्रशासनाकडून स्थायीला प्रस्ताव देण्यात आला. काही सदस्यांचा विरोध असताना भारतीय यांनी महापालिकेच्या हिताचा निर्णय घेतला. तत्कालीन बाजार परवाना अधीक्षक गंगाप्रसाद जयस्वाल आणि रामदास डोंगरे यांच्या स्वाक्षरीचे करारनामे चुकीचे व नियमबाह्य असल्याने ते अमान्य करून सद्यस्थितीतील नियमानुसार असलेले करारनामे व ज्यांना मध्यंतरीच्या कालावधीत मुदतवाढ दिलेली नाही किंवा त्यांची मुदत संपली नाही, अशा पात्र गाळेधारकांशी ६० आणि ६१ रुपये चौरस फुट दराने भाडेकरार करण्याच्या प्रस्तावाला स्थायीने हिरवी झेंडी दिली आहे. उपरोक्त दोन्ही संकुलांची मुदत अस्तिवात असलेल्या कालावधीपर्यंत त्यांच्यासोबत नव्याने करारनामे करण्यात येतील.
ज्या गाळेधारकांनी विविध कारणास्तव करारनाम्यातील अटी व शर्र्तींचा भंग केला आहे, तोडफोड करून नव्याने बांधणी केली, अशा गाळेधारकांचे करारनामे रद्द करण्यात यावेत व हे सर्व गाळे लिलाव पद्धतीने पात्र व्यक्तीस वितरित करण्यात यावेत, असा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीला दिला आहे. लिलावाच्या माध्यमातून गाळे वितरित करण्याकरीता आधारभूत मूल्य (अपसेट प्राईस) प्रस्तावित दर विचारात घेण्यात येतील, असे प्रशासनाने म्हटले आहे. या प्रस्तावालाही स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
आतापर्यंत १ रूपये प्रतिचौरसफुटाचे भाडे देणाऱ्या आणि प्रसंगी तेही चुकविणाऱ्या, दुकाने परस्पर विकून महापालिकेला चूना लावणाऱ्या व्यापाऱ्यांच्या समर्थनार्थ भाजपातील काही नगरसेवक उभे राहिले.
एक रूपयावरून ६० रूपये भाडे करणे, ही महापालिकेची मोनोपल्ली असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाच्या रेडिरेकनर आणि दीडपट भाडेआकारणीचा निषेध केला. स्थायीची बैठक होण्याआधी व्यापारी महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ व्यापारपेठ बंद करीत असल्याची आगाऊ सूचना एका भाजप नगरसेवकाने तुषार भारतीय यांना दिली. मात्र, प्रशासन आणि भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारीही ऐकत नसल्याने त्यांचा हिरमोड झाला. दुपारी व्यापाऱ्यांनी पालकमंत्री प्रवीण पोट,जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची भेट घेतली.
असा होता प्रशासनाचा प्रस्ताव
एडीटीपीने रेडिरेकनरनुसार प्रियदर्शिनी संकुलाचे ५९.०१ रु आणि जवाहर गेट संकु लाचे ६०.१३ रुपये प्रति चौरसफुट प्रतिमहिना असे दर निश्चित केलेत. .त्यानुसार प्रियदर्शिनी संकुलाचे भाडे प्रतिमहिना ६० रुपये चौरस फुट आणि जवाहरगेट संकुलाचे भाडे ६१ रुपये, असे विचारात घ्यावेत असे या प्रस्तावात म्हटले होते. तथापि प्रस्तावित करण्यात आलेले हे दर बाजारमूल्यापेक्षा कमी असल्याने यापूर्वी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना मनपा भूखंडाचे वितरण करताना शिघ्र सिद्ध गणकाच्या (रेडिरेकनर)किमान दीडपट आकारणी करण्यात यावी, असा निर्णय महासभेत घेण्यात आल्याने तोच निर्णय उभय संकुलाबाबत लागू करावा, हा निर्णय लागू केल्यास प्रियदर्शिनी संकुलाचे भाडे ९० रुपये आणि जवाहरगेट संकुलाचे भाडे ९१ रुपये प्रतिचौरस फुट प्रतिमाह असे विचारात घ्यावे, असा प्रस्ताव मंगळवारी प्रशासनाकडून देण्यात आला. मात्र तो प्रस्ताव नाकारण्यात आला.