कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणारी ‘जिवंत माणसं’ कोरोनापासून दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:15 IST2021-03-10T04:15:15+5:302021-03-10T04:15:15+5:30
अमरावती : ‘कोरोना पॉझिटिव्ह’ हा शब्द उच्चारला की, भल्याभल्यांना कापरे भरते. मात्र, कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणाऱी ‘जिवंत माणसं’ आजही कोरोनापासून ...

कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणारी ‘जिवंत माणसं’ कोरोनापासून दूर
अमरावती : ‘कोरोना पॉझिटिव्ह’ हा शब्द उच्चारला की, भल्याभल्यांना कापरे भरते. मात्र, कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणाऱी ‘जिवंत माणसं’ आजही कोरोनापासून दूरच आहेत. मृतदेह हे कोणत्याही आजाराचे असो, त्यांच्यावर यथोचित अंत्यसंस्कार हे पुण्यकर्मच आहे, ही भावना बाळगून निरंतर अंत्यसंस्काराचे ते कर्तव्य पार पाडत आहेत. येथील हिंदू स्मशानभूमीत एकूण १९ कर्मचारी कार्यरत आहेत.
गतवर्षी मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. एप्रिलमध्ये कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आतापर्यंत कोरोनाने ५७२ जणांचा बळी घेतला आहे. अमरावती महानगरात १५ स्मशानभूमी असून, दफनभूमी वेगळ्या आहेत. मुस्लिम समाजासाठीची दफनभूमी स्वतंत्र आहेत. कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी येथील हिंदू स्मशानभूमीतील गॅस दाहिनीत एकूण १९ कर्मचारी कार्यरत आहे. सकाळी ८ ते रात्री ११ वाजताच्या सुमारास ‘कोविड, नॉन कोविड’ अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार केला जातो. कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यानंतर आप्तदेखील जवळ जात नाहीत. स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणारे मात्र हे पुण्यकर्म असल्याचे समजून सेवा देत आहेत. आतापर्यंत यापैकी एकाही कर्मचाऱ्याला कोरोनाने ग्रासले नाही. एवढेच नाही तर, कुटुंबात कुणीही संक्रमित आढळून आले नाही, अशी माहिती आहे. मनात कोणतीही चलबिचल नाही. ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता, केवळ कर्तव्य हीच भावना मनात बाळगून कोरोनाग्रस्तांवर अव्याहतपणे ते अंत्यसंस्कार करीत आहेत. आम्हालाही कुटुंब आहे, मुले आहेत, परंतु समाजाचे काही देणे आहे. समर्पित भावनेतून मृतदेहांवर अंत्यसंस्काराचे कर्तव्य बजावत असल्याचे त्यांचे मत आहे.
-----------------
शहरातील स्मशानभूमी
हिंदू स्मशानभूमी. नवसारी. रहाटगाव. एसआरपीएफ परिसर. शंकरनगर. फ्रेजरपुरा. बडनेरा नवी वस्ती. जुनीवस्तीतील चमननगर. रेल्वे गेट. वरूडा. विलासनगर. शेगाव येथील पद्मसौरभ कॉलनी.
------------
मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्यांची संख्या - १९
-------
कोट (फोटो घेणे)
कोरोना आता आला. मात्र, स्मशानभूमीत कर्तव्य बजावल्यानंतर घरात प्रवेश करण्यापूर्वी दररोज गरम पाण्याने आंघोळ हा नेहमीचा रीवाज आहे. स्मशानभूमीत मास्कचा वापर, सॅनिटायझरला प्राधान्य दिले जाते. कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्काराच्या वेळी सुरक्षित अंतर ठेवले जाते. स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी य्श्यक आहेच.
- एकनाथ इंगळे, प्रबंधक, हिंदू स्मशानभूमी
------
कोट(फोटो घेणे)
जी व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी आयुष्यभर झटली, ती कोरोनाने दगावल्यास कोणीच जवळ येत नाही. अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे भाग्य आमच्या वाट्याला आले आहे. आम्ही घरात जाण्यापूर्वी आंघोळ करतो. कुटुंबीयांनासुद्धा मास्कचा वापर, नियमित हात धुण्याची सवय लागली आहे.
- किसन लांडगे, कर्मचारी, हिंदू स्मशानभूमी
---------
कोट(फोटो घेणे)
स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्काराचे कर्तव्य फार कमी लोकांच्या वाट्याला येते. आम्ही सामाजिक जाणिवेतून कर्तव्य बजावत आहोत. ज्यांना कुणीच नाही, त्यांचे आम्ही आहेत, असा सेवाभाव सुरू आहे. घरी परतल्यावर आंघोळ, नियमित स्वच्छता आणि मास्कचा वापर सुरू आहे. घरात कोणीही पॉझिटिव्ह नाही.
- मनोहर गायकवाड, कर्मचारी, हिंदू स्मशानभूमी.