८९ शाळांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 05:00 AM2020-06-14T05:00:00+5:302020-06-14T05:01:14+5:30

वादळी वाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींचे मोठे नुकसान केले आहे. चिखलदरा तालुक्यातील तब्बल ३८ शाळा प्रभावित झाल्या आहेत. काही शाळांच्या वर्गखोल्या जीर्ण झाल्यामुळे केव्हा कोसळतील, अशी अवस्था झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांकडे मुलांना आकर्षित करण्यासाठी तसेच पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने मागील काही वर्षांपासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

Fall of 89 schools | ८९ शाळांची पडझड

८९ शाळांची पडझड

Next
ठळक मुद्देवादळी वाऱ्याचा फटका । धोकादायक शाळांमध्येच होणार का शिक्षण ?

जितेंद्र दखने।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लॉकडाऊनच्या काळात अवकाळी पावसासोबत धडकलेल्या वादळी वाऱ्यांनी खेड्यापाड्यातील जिल्हा परिषदेच्या ८९ शाळांच्या वर्गखोल्यांची नासधूस केली. काही जीर्ण वर्गखोल्या ढासळल्या. काही वर्गखोल्यांचे छप्पर उडून गेले. विशेष म्हणजे, पर्यायी व्यवस्था नसल्याने या इमारतीमधून अन्यत्र शाळा हलविता येत नाही आणि पुरेसा निधी नसल्यामुळे त्या बांधता येत नाही. त्यामुळे अशा धोकादायक वर्गातच मुलांच्या सुरक्षिततेची शक्य ती काळजी घेऊन त्यांचे भवितव्य घडविण्याचा प्रयत्न शिक्षक करणार आहेत. पालकांनाही काळजावर दगड ठेवून विद्यार्थ्यांना येथे शिकविण्यास पाठवावे लागणार आहे.
वादळी वाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींचे मोठे नुकसान केले आहे. चिखलदरा तालुक्यातील तब्बल ३८ शाळा प्रभावित झाल्या आहेत. काही शाळांच्या वर्गखोल्या जीर्ण झाल्यामुळे केव्हा कोसळतील, अशी अवस्था झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांकडे मुलांना आकर्षित करण्यासाठी तसेच पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने मागील काही वर्षांपासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिक्षकांच्या परिश्रमातून जिल्हा परिषदेतील शाळांमधील मुले शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकले आहेत. असे असले तरी खासगी शाळांबद्दल ग्रामीण भागातील पालकांनाही आकर्षण आहे. खासगी शाळांमुळे जिल्हा परिषदांच्या शाळांतील विद्यार्थिसंख्या घटू लागली. काही शाळांमध्ये २० पेक्षा कमी मुले राहू लागली. रिकाम्या वर्गखोल्यांकडे शाळांचे दुर्लक्ष होऊ लागले. वादळ, अतिवृष्टी यामुळे या खोल्यांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक शाळांचे दरवाजे, खिडक्या, भिंत, टीनपत्रे, संरक्षण भिंत, कवेलू पूर्णत: नेस्तनाबूत झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकासकामांना कात्री लावण्यात आल्याने वर्गखोल्यांच्या आणखी काही महिने तरी शासनाकडून पुरेसा निधी मिळणे अवघड आहे. त्यामुळे जिल्ह्यातील या पडझड झालेल्या व धोकादाक वर्गखोल्यांची संख्या वाढतच जाण्याची शक्यता आहे. या शाळा शैक्षणिक सत्र सुरू होण्याअगोदर दुरुस्त होतील की तशाच राहतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धोकादायक इमारतींची अशी आहे संख्या
चिखलदरा ३८. मोर्शी १०. अमरावती ७. भातकुली ७. अचलपूर ५. धारणी ५. दयार्पूर ५. नांदगाव खंडेश्वर ४. चांदूर बाजार २. अंजनगाव सुर्जी २. तिवसा २. चांदूर रेल्वे १. धामणगाव रेल्वे १.

वादळाने पडझड झालेल्या व शिकस्त वर्गखोल्यांसाठी पुरेसा निधी मिळावा, असा ठराव शिक्षण समितीने घेतला. सेस फंडातून पाच टक्के निधी उपलब्ध झाला तरी पूर्णपणे दुरुस्तीचे कामे होऊ शकत नाहीत. त्यामुळे आवश्यक निधी मिळण्याकरिता समन्वयातून डीपीसीकडे निधीची मागणी के ली आहे. त्यानुसार पुरेसा निधी उपलब्ध करून शैक्षणिक सत्रापूर्वी वर्गखोल्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न आहे.
- प्रियंका दगडकर, शिक्षण सभापती

अनेक शाळांतील जीर्ण वर्गखोल्यांची वादळी वाºयाने पडझड झाली आहे. त्यानुसार दुरुस्तीकरिता वरिष्ठस्तरावर पाठपुरावा केला आहे. यावर समन्वय ठेवून तोडगा काढण्याचा प्रयत्न होत आहे. शैक्षणिक सत्रापूर्वी शाळा दुरुस्त कशा करता येतील, यासाठी प्रशासनाचा प्रयत्न आहे.
- नितीन उंडे
उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक)

Web Title: Fall of 89 schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा