अकोल्यात खोट्या जीएसटी बिलांचा स्फोट : ९.९७ कोटींचा घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 15:22 IST2025-07-17T15:21:56+5:302025-07-17T15:22:34+5:30

जीएसटी विभागाची कारवाई : सात व्यापाऱ्यांना व्यापाराविना बिल दिल्याचे उघड

Fake GST bills explode in Akola: Scam of Rs 9.97 crore | अकोल्यात खोट्या जीएसटी बिलांचा स्फोट : ९.९७ कोटींचा घोटाळा

Fake GST bills explode in Akola: Scam of Rs 9.97 crore

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
प्रत्यक्षात मालाची खरेदी- विक्री न करता फक्त जीएसटीची बिले देऊन व त्याबदल्यात कमिशन घेऊन उरलेली रक्कम परत करण्याचा गोरखधंदा सध्या फोफावला आहे. असे व्यापारी सध्या जीएसटी विभागाच्या 'रडार'वर आहेत. अकोला येथील प्रतीक गिरीराज तिवारी याला बुधवारी तब्बल ९.९७ कोटींच्या जीएसटी चोरीप्रकरणी या विभागाने अटक केली आहे.

 
तिवारीने डाबकी रोड अकोला येथे २९ मार्च २०१९ पासून स्वामी सार्थ किराणा या नावाने सिमेंट, स्टील रॉइस, हार्डवेअरसाठी जीएसटी कायद्याखाली नोंदणी केली होती. या व्यवसायाच्या संशयास्पद व्यवहारावर जीएसटी विभाग नजर ठेवून होता. महालक्ष्मी सेल्स या नावाने गिरीराज तिवारी यांचाही याच प्रकारच्या मालाच्या फेरविक्रीचा व्यवसाय जीएसटी कायद्याखाली याच पत्त्यावर नोंदविल्याची माहिती या विभागाने दिली.


राज्यातील सात व्यापाऱ्यांकडून तिवारी यांनी खोटी बिले घेतल्याचे तपासात उघड झाले आहे, शिवाय कर्नाटक राज्यातील दोन व्यापाऱ्यांनी देखील जीएसटी कायद्याखाली नोंदणी केली व नंतर ती रद्द केली. यांच्याकडून खोट्या बिलाच्या आधारे ९.९७ कोटी टॅक्सचे इनपुट क्रेडिट विवरणपत्र घेतले. फसवणुकीची रक्कम पाच कोटींवर असल्याने दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे. अपर राज्य कर आयुक्तांनी अटक वॉरंट जारी केले. त्यानुसार तिवारी यांना अटक करून बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. राज्य कर उपायुक्त एकनाथ पावडे, अमरावती विभाग सहआयुक्त संजय पोखरकर यांच्या मार्गदर्शनात महेशकुमार घारे, अजय तुरेराव व पथकाने ही कारवाई केली.


व्यवसाय न करता यांनी दिली खोटी बिले

  • खामगाव येथील आकाश अडचुळे व सज्जन पुरी, तेथीलच अनिस शाह ग्रोव्हर शाह यांनी प्रत्यक्षात कोणताही व्यवसाय न करता फक्त खोटी बिले तिवारी यांना दिली.
  • कराचा भरणा न करता जीएसटी पोर्टलवर बिलाची माहिती नमूद केली. तेथे धाड टाकून झडती घेण्यात आली असता त्यांनी खोटी बिले दिल्याची कबुली दिली.
  • त्यानंतरच तिवारी यांच्या आस्थापनेवर धाड टाकण्यात आली होती.

Web Title: Fake GST bills explode in Akola: Scam of Rs 9.97 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.