महाविद्यालयातील सुविधांची तपासणी होणार
By Admin | Updated: May 18, 2014 23:14 IST2014-05-18T23:14:25+5:302014-05-18T23:14:25+5:30
शासनाकडून अनुदान घ्यायचे आणि विद्यार्थ्यांना सुविधा पुरविण्यात मात्र हयगय करायची, असा प्रकार निदर्शनास आल्याने उच्चशिक्षण विभागाने राज्यातील महाविद्यालयांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाविद्यालयातील सुविधांची तपासणी होणार
अमरावती : शासनाकडून अनुदान घ्यायचे आणि विद्यार्थ्यांना सुविधा पुरविण्यात मात्र हयगय करायची, असा प्रकार निदर्शनास आल्याने उच्चशिक्षण विभागाने राज्यातील महाविद्यालयांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण सहसंचालक कार्यालयामार्फत अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील महाविद्यालयांची १९ ते २९ मे या कालावधीत तपासणी होणार आहे. उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. अनुदान मंजूर करताना महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्ता वाढ, संशोधन आणि कॅम्पसमध्ये पायाभूत सुविधांची उपलब्धता करावी, असे निर्देश आहेत. मात्र, अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये आदेशांचे पालन झाले नसल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर उच्चशिक्षण विभागाने महाविद्यालयांची तपासणी मोहीम हाती घेतली. महाविद्यालयामधील पायाभूत सुविधा, विद्यापीठाशी संलग्नता, मान्यताप्राप्त अभ्यासक्रम, नियमित पदभरतीची कार्यवाही, रिक्त पदांची संख्या, नवीन अभ्यासक्रम, प्राचार्यांसाठी केबीन, प्राध्यापक कक्ष, विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी सुविधा अशा २१ मुद्यांच्या आधारे महाविद्यालयांची तपासणी होणार आहे. विभागात अनुदानित, विना अनुदानित महाविद्यालयांची संख्या २०० हून अधिक आहे. यासंदर्भात विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातर्फे तपासणीच्या पूर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर प्राचार्यांची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर ही तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. (प्रतिनिधी)