ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये नफा झाल्याचे भासवून ३२ लाखांना गंडा, सायबर ठाण्यात गुन्हा
By प्रदीप भाकरे | Updated: November 26, 2023 15:28 IST2023-11-26T15:27:01+5:302023-11-26T15:28:02+5:30
फसविल्या गेलेल्या स्थानिक व्यक्तीची ओळख गुप्त

ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये नफा झाल्याचे भासवून ३२ लाखांना गंडा, सायबर ठाण्यात गुन्हा
अमरावती: ऑनलाईन ट्रेडिंगच्या व्यवहारात आभासी नफा दाखवून येथील एकाची तब्बल ३१ लाख ९० हजार रुपयांनी ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. २७ सप्टेंबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान फसवणुकीची ती मालिका चालली. आपले नाव जाहिर करू नये, अशी विनंती केल्याने याप्रकरणातील फिर्यादीचे नाव उघड करण्यात सायबर पोलिसांनी नकार दिला. त्यामुळे ३२ लाख रुपये गमावणारा अमरावतीतील व्यक्ती कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या प्रकरणी फसवणूक झालेल्या एका व्यक्तीच्या तक्रारीवरून शहर आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्याने २५ नोव्हेंबर रोजी एका व्हॉट्सॲप युजरसह एका संकेतस्थळधारकाविरूध्द फसवणुकीसह माहिती व तंत्रज्ञान कायदयातील कलमान्वये गुन्हा दाखल केला. यातील तक्रारकत्या एका व्यक्तीला सप्टेंबर महिन्याच्या पुर्वार्धात फेसबुकवर एका अज्ञाताने टाकलेली पोस्ट निदर्शनास आली. त्यात दामदुप्पट नफा मिळवून देण्याची जाहिरात नमूद होती. त्यानंतर एका अज्ञात व्हॉट्सॲप युजरने येथील त्या व्यक्तीशी संपर्क साधला. त्या युजरने तक्रारकत्या व्यक्तीला ऑनलाईन ट्रेडिंग करून मोेठा नफा मिळविण्याचे, मिळवून देण्याचे आमिष दाखविले.
आरोपीने येथील त्या व्यक्तीला अमेरिकेतील शिकागोस्थित एका आंतरराष्ट्रिय कमर्शियल मॅनेजमेंट कंपनीची वेबसाईट पाठविली. त्याला त्या संकेतस्थळाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. ऑनलाईन ट्रेडिंग सुरू झाले. त्यानंतर आरोपींनी त्याला आभासी अर्थात व्हच्युअल प्रॉफिट दाखविले. त्यामुळे तक्रारकर्ता देखील त्या मोहात अडकला. त्यानंतर आरोपींनी वेगवेगळी कारणे सांगून त्याच्याकडून सव्वा महिन्याच्या कालावधीत तब्बल ३१ लाख ९० हजार रुपये उकळले.