नियमापेक्षा अतिरिक्त व्याज घेऊन धाकदपटशाही; अमरावतीतील अवैध सावकाराविरुद्ध गुन्हा
By प्रदीप भाकरे | Updated: August 31, 2022 18:29 IST2022-08-31T18:27:27+5:302022-08-31T18:29:38+5:30
दिनेश गहलोत याच्या घराची पंचांसमक्ष झडती घेतली. त्यावेळी कोरे धनादेश, मुद्रांक व काही रजिस्टर मिळून आले.

नियमापेक्षा अतिरिक्त व्याज घेऊन धाकदपटशाही; अमरावतीतील अवैध सावकाराविरुद्ध गुन्हा
अमरावती : अवैध सावकारी करणाऱ्या दिनेश गहलोत व एक महिला (दोघेही रा. न्यू प्रभात कॉलनी, शिलांगण रोड) यांच्याविरुद्ध राजापेठ पोलिसांनी २९ ऑगस्ट रोजी रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी तालुका उपनिबंधक गजानन वडेकर यांनी तक्रार नोंदविली. तक्रारीवरून वडेकर व चमूने १८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास दिनेश गहलोत याच्या घराची पंचांसमक्ष झडती घेतली. त्यावेळी कोरे धनादेश, मुद्रांक व काही रजिस्टर मिळून आले.
आरोपी दिनेश व ती महिला अवैध सावकारी पैशाची देवाणघेवाण करत असून, नियमापेक्षा अतिरिक्त व्याज घेत असल्याची तक्रार सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाकडे करण्यात आली होती. अतिरिक्त व्याज घेऊन धाकदपटशाही करतात, अशा तक्रारीवरून वडेकर यांच्या नेतृत्वातील चौकशी पथकाने गहलोत याचे घर गाठले होते. घरझडतीत आढळलेल्या दस्तावेजाच्या आधारे वडेकर यांनी २९ ऑगस्ट रोजी राजापेठ पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी गहलोत व एका महिलेविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.