उद्योग उभारून इतरांना रोजगार द्या
By Admin | Updated: June 6, 2017 00:06 IST2017-06-06T00:06:05+5:302017-06-06T00:06:05+5:30
माझ्या डिक्शनरीत नाही हा शब्दच नाही. एकदा जे ठरवले ते मी करतोच. विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीच्या बळावर ध्येय गाठावे.

उद्योग उभारून इतरांना रोजगार द्या
पालकमंत्री : पोटे इन्स्टिट्यूटमध्ये ‘आॅफर लेटर’ वितरण
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : माझ्या डिक्शनरीत नाही हा शब्दच नाही. एकदा जे ठरवले ते मी करतोच. विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीच्या बळावर ध्येय गाठावे. उच्चशिक्षण घेऊन चांगली नोकरी करणे उत्तमच. पण, स्वत:चा उद्योग करून इतरांना रोजगार देण्याचा पर्याय देखील विद्यार्थी निवडू शकतात, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोेटे यांनी केले.
स्थानिक पी.आर.पोटे पाटील ग्रुप आॅफ एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्यावतीने विविध कंपन्यांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा ‘आॅफर लेटर’ वितरण समारोह शनिवारी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात पार पडला. अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री बोलत होते. पी.आर.पोटे ग्रुपद्वारे विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख होऊन स्वत:च्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे, यासाठी संस्था प्रयत्नरत आहे, असेही पालकमंत्री म्हणाले. यावेळी महाविद्यालयाच्या एचआर हेड मोनिका उपाध्याय यांनी कॅम्पस प्लेसमेंट बद्दलची विस्तृत माहिती दिली. सन २०१७ मध्ये महाविद्यालयातून एकूण ४५ विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला आहे.
कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून "लोकमत"चे गणेश देशमुख, अनिल अग्रवाल, अमोल इंगोले, राजेश अग्रवाल, डी.जीवाकडे, एस.डी.वाकडे, उपप्राचार्य मोहम्मद झुयर, अजय सामदेकर, मोनिका उपाध्यय जैन आदी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी संस्थेचा आतापर्यंतचा कामकाजाचा आढावा घेतला. संस्थेद्वारा गरजू व हुशार विद्यार्थ्यांना दिली जाणारी स्कॉलरशिप, विद्यार्थ्यांकरिता दरवर्षी नि:शुल्क आयोजित केला जाणारा विदेश दौरा, महिलांना स्वयंरोजगाराचे नि:शुल्क प्रशिक्षण, संस्थेद्वारा संशोधन कार्यावर दिला जाणारा भर आदींबाबतही माहिती दिली. विद्यार्थी दत्तक योजनेंतर्गत संस्थेद्वारे अनेक विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आसे आहे. ‘सेवा’नावाचे युनिट तयार करून १५ हजार महिलांना रोजगाराचे धडे देण्यात आलेत. स्वस्त घर बांधण्याचे तंत्रज्ञान येथील विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग समाजाला होत आहे, हे विशेष. पोटे इन्स्टिट्यूटतर्फे यावर्षी विद्यार्थ्यांना सर्वाधिक २ कोटी ८५ लाख रूपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सागर सोनखासकर, दीपिका उदासी, तर आभार प्रदर्शन रवी शेंडे यांनी केले.