गावतलाव कॅनलच्या वेस्ट वेअरने भरण्याचा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:02 IST2018-05-12T22:02:14+5:302018-05-12T22:02:14+5:30
शेतकऱ्यांना पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत आहे. यावर मात करून अचलपूर तालुक्यातील ३०० हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आणण्यासाठी कॅनलचे वाया जाणारे पाणी तलावात सोडण्याचा अभिनव प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचा प्रयोग आ. बच्चू कडू यांच्या प्रयत्नाने होणार आहे.

गावतलाव कॅनलच्या वेस्ट वेअरने भरण्याचा प्रयोग
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : शेतकऱ्यांना पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत आहे. यावर मात करून अचलपूर तालुक्यातील ३०० हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आणण्यासाठी कॅनलचे वाया जाणारे पाणी तलावात सोडण्याचा अभिनव प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचा प्रयोग आ. बच्चू कडू यांच्या प्रयत्नाने होणार आहे. त्यांनी शनिवारी पहाटे ५.३० पासून परिसरातील गावांचा दौरा केला.
अचलपूर तालुक्यातील रासेगाव, नायगाव, चमक, सुरवाडा, खोजनपूर आदी गावांचा दौरा आ. बच्चू कडू यांनी शनिवारी केला. यावेळी त्यांच्यासोबत जि.प. लघुपाटबंधारे उपविभागीय अभियंता एस.पी. कुलकर्णी, चंद्रभागा प्रकल्पाचे रूपेश मोहिते, एन.डी. वानखडे, ओंकार पाटील, प्रहारचे अंकुश जवंजाळ, दीपक धुळधर, मंगेश हूड, संजय तट्टे, उपसभापती सोनाली तट्टे आदी उपस्थित होते.
कॅनलचे पाणी तलावात सोडणार
चंद्रभागा प्रकल्पावरील कॅनलमधील पाणी वाया न जाऊ देता, ते या गावातील तलावात सोडण्याचा अभिनव प्रयोग केला जाणार आहे. पावसाळा संपताच कोरड्या पडणाऱ्या तलावांना या प्रयोगाने पुनर्जीवन मिळण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे. त्यादृष्टीने उपस्थित अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करून योग्य पर्याय काढण्याच्या सूचना आ. बच्चू कडू यांनी दिल्या. तलावातील पाण्यातून गावातील पिण्याच्या पाण्यासह परिसरातील विहिरी, बोअरवेलची पातळी वाढण्याचा प्रयोग यातून केला जाणार आहे.