निस्तानेंचे काम असमाधानकारक
By Admin | Updated: July 5, 2017 00:43 IST2017-07-05T00:43:56+5:302017-07-05T00:43:56+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रूग्णालयातील निलंबित बालरोग विभागप्रमुख डॉ.राजेंद्र निस्ताने यांचे कार्य मागील पाच वर्षांपासून असमाधानकारक असल्याचे स्पष्ट होत आहे.

निस्तानेंचे काम असमाधानकारक
डीनकडून वारंवार पत्र : पीडीएमसी प्रशासनाचा वरदहस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रूग्णालयातील निलंबित बालरोग विभागप्रमुख डॉ.राजेंद्र निस्ताने यांचे कार्य मागील पाच वर्षांपासून असमाधानकारक असल्याचे स्पष्ट होत आहे. अधिष्ठाता दिलीप जाणे यांनी निस्तानेंना दिलेल्या पत्रवजा कारणेदाखवा नोटीसमधून हे वास्तव उघड होत आहे.
सन २०१२ आणि १३ च्या गोपनीय अहवालात डॉ.राजेंद्र निस्तानेंचे काम असमाधानकारक असल्याचे ‘लोकमत’च्या हाती आलेल्या दोन पत्रांमधून स्पष्ट होत आहे. तथापि निस्ताने यांचे सेवाकार्य असमाधानकारक असताना पीडीएमसी प्रशासनाने त्यांना तब्बल पाच वर्षे विशेष वागणूक का दिली, हे अद्याप अनुत्तरीत आहे. २९ मेच्या मध्यरात्री एकापाठोपाठ एक अशा चार नवजात शिशुंचा मृत्यू झाल्याच्या पाश्वभूमिवर डॉ.राजेंद्र निस्ताने यांना निलंबित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने निस्ताने यांना यापूर्वीही ताकिद देण्यात आली होती. त्यांच्या कामासह त्यांनी केलेला खुलासाही असमाधानकारक असल्याचे जाणे यांनी स्पष्ट केले आहे. जाणे यांच्या स्वाक्षरीनेच १५ जून २०१२ आणि २२ मे २०१३ ला डॉ. राजेंद्र निस्ताने यांना गोपनीय ताकिद देण्यात आली.
सन २०११-१२ मध्ये बालरोग विभागाच्या प्रमुखांकडून प्राप्त झालेल्या गोपनीय अहवालामध्ये आपली सेवा असमाधानकारक असल्याचे डॉ. जाणे यांनी या पत्रात म्हटले होते. तर २२ मे २०१३ च्या पत्रामध्ये पीडीएमसीतील उच्चपदस्थ यंत्रणेच्या सूचनेची अवज्ञा केल्याचा ठपकाही निस्ताने यांच्यावर ठेवण्यात आला होता. पीडीएमसीच्या बालरोगतज्ज्ञ विभागामधील निवासी यंत्रणा सदोष पद्धतीने काम करीत असून त्यांच्यावर निस्ताने यांचे नियंत्रण नसल्याने २७ मे २०१३ पर्यंत याबाबतचा खुलासा आपल्याकडे द्यावा, अशी ताकिद डॉ. जाणे यांनी निस्तानेंना दिली होती. दोन्ही वर्षांच्या वार्षिक गोपनिय अहवालामध्ये निस्ताने यांच्यावर असमाधानकारकतेचा ठपका असतानाही त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.
डॉ. निस्तानेंच्या अखत्यारित येत असल्याचे निरीक्षण नोंदवून शासनाच्या तज्ज्ञ समितीने एनआयसीयूमधील अनियमीततेकडे अंगुली निर्देश केला आहे. म्हणून निस्तानेंवर निलंबनासह फौजदारी गुन्हा नोंदविण्याची मागणी मृत शिशुंच्या पालकांनी केली आहे. मात्र, तरीही निस्तानेंवर पीडीएमसी प्रशासनाचा वरदहस्त कायम आहे.
यापूर्वीही बालमृत्यू झाल्याची शक्यता
सन २०१२ पासून बालरोग विभागातील कामकाज योग्यरित्या चालत नसल्याचे आढळून येते. त्यामुळे तेव्हापासून आतापर्यंत बालरोग विभाग व एनआयसीयूतीव काही शिशू व बालकांचे मृत्यू झाले असावेत, अशी शंका उपस्थित होत आहे. पीडीएमसी प्रशासनाने वेळेवर लक्ष देऊन योग्य ती कारवाई व सुधारणा केली असती तर चार शिशुंचे प्राण वाचले असते.
जिल्हा विधी, सेवा
प्राधिकरणाकडे पालकांचे अर्ज
चार शिशुंच्या मृत्युप्रकरणात डॉ.भूषण कट्टाच्या जामीनावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मृत शिशुंच्या पालकांना प्रत्येकी २ लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाकडे पालकांचे अर्ज प्राप्त झाले असून पुढील प्रक्रिया सुरु झाली आहे.
काय म्हणते "व्हायकेरियस लायबिलिटी?"
एखाद्या संस्थेतील अधिकारी,कर्मचाऱ्यांची नियुक्ती त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार त्या पदावर झाली आहे काय, असे नसेल तर त्याने केलेल्या चुकीची जबाबदारी ही वरिष्ठांवर येते. "व्हायकेरियस लायबिलीटी" कायद्यात अशी तरतूद असल्याची माहिती ‘इंडियन मेडीको लिगल अॅन्ड ईथिक्स असोसिएशन’चे संस्थापक अध्यक्ष सतीश तिवारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पीडीएमसीत घडलेल्या शिशूमृत्यू प्रकरणात "व्हायकेरियस लायबिलीटी"तील तरतुदींवर प्रकाश टाकल्यास कारवाईची दिशा मिळण्याची शक्यता असल्याचे तिवारी यांचे मत आहे.
शिशूंच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची ?
एनआयसीयूतील परिचारिकेने चुकीचे इंजेक्शन दिल्याने तीन शिशू दगावले. त्यापरिचारिकेची परिचारिकापदासाठी शैक्षणिकदृष्ट्या झालेली नियुक्ती योग्य आहे का, तिच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी युनिट इन्चार्ज आहेत. त्यांनी रूग्णांना तपासून परिचारिकेला योग्य मार्गदर्शन केले काय, एनआयसीयूत राऊंड मारणाऱ्या युनिट इन्चार्ज डॉक्टरांनी त्या शिशुंच्या प्रकृतीकडे लक्ष दिले का, युनिट इन्चार्जच्या कामावर बालरोग विभागप्रमुखांनी लक्ष दिले का, बालरोगतज्ज्ञाने त्यांची जबाबदारी योग्यरित्या सांभाळली का, या गोष्टी तपासण्याचेकाम अधिष्ठात्यांकडे होते, त्यांनी ती जबाबदारी पूर्ण केली का, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हा गुंता ‘व्हायकेरियस लायबिलिटी‘तून सुटू शकेल, अशी आशा आयएमएलई असोसिएशनचे संस्थापक सतीश तिवारी यांनी व्यक्त केली.
मला निश्चित आठवत नाही. मात्र, सन २०१२ व २०१३ मध्ये बालरोग विभागातील असमाधानकारक कामकाजाबाबत डॉ.राजेंद्र निस्तानेंना पत्र दिले असावे. त्यांनी सुधारणा केली असावी. त्यामुुळे त्यानंतर पत्र देण्याची वेळ आली नाही.
-दिलीप जाणे, अधिष्ठाता, पीडीएमसी.