गणित, भौतिकशास्त्र वगळल्याने ‘अभियांत्रिकी’ होणार कमकुवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:13 IST2021-03-18T04:13:37+5:302021-03-18T04:13:37+5:30
अमरावती : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) निर्णयानुसार गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र ह विषय बारावीला न घेताही विद्यार्थी अभियांत्रिकी ...

गणित, भौतिकशास्त्र वगळल्याने ‘अभियांत्रिकी’ होणार कमकुवत
अमरावती : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) निर्णयानुसार गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र ह विषय बारावीला न घेताही विद्यार्थी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ शकतील. मात्र, हा निर्णय रिक्त जागा भरण्यासाठी घेतला असला तरी हा निर्णय म्हणजे ‘अभियांत्रिकी’ कमकुवत करण्याचा प्रकार होय, असा प्रश्न तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.
गणित, भौतिकशास्त्र हे दोन विषय सिव्हिल, मॅकेनिकल व इलेक्ट्रिकल या अभियांत्रिकीच्या मुख्य शाखांचा कणा मानला जातो. त्यामुळे अकरावी, बारावीला या विषयाचे ज्ञान न घेता अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यास विद्यार्थी कौशल्य आत्मसात करू शकणार नाहीत, असे मत ठामपणे तज्ज्ञांनी वर्तविले आहे. तर, दुसरीकडे असाही सूर उमटत आहे की, नवीन शैक्षणिक धोरणात जागतिक स्तरावर सारखेच शिक्षण उपलब्ध व्हावे, याचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे एआयसीटीईने हा नवा पायंडा पाडला असावा, असाही सूर पुढे आला आहे.
बारावीला या गणित, भौतिकशास्त्र विषयाचे शिक्षण न घेता अभियांत्रिकीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने किंवा विद्यापीठाने स्वतंत्र मार्गदर्शन वर्ग (ब्रिज कोर्स) तयार करावेत, असाही सूर उमटत आहे. जिल्ह्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासह विनाअनुदानित अभियांत्रिकी दहा महाविद्यालये असून, २० हजार विद्यार्थी संख्या आहे.
------------------
गणित, भौतिकशास्त्राविना कसा घडेल विद्यार्थी
गणित, भौतिकशास्त्रविना ‘अभियांत्रिकी’ पूर्ण होऊ शकत नाही. अकरावी, बारावीत हे विषय नसले तरी पुढे अभियांत्रिकी अभ्यासक्रमात असणे आवश्यक करावे. त्यामुळे विद्यार्थी कसा घडेल, हा प्रश्न आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची पदवी सर्वांना घेता यावी यासाठी हा निर्णय सर्वसमावेशक आहे. तथापि, अभियांत्रिकीचे अभ्यासक्रम घेताना हे दोनही विषय असावेत.
- रामकृष्ण धायगुडे, गणित विभागप्रमुख, व्हीएमव्ही
--------------
हा निर्णय म्हणजे नवकल्पनांवर नकारात्मक परिमाण
भौतिकशास्त्र हा एक वैज्ञानिक आधार असून, गणिताचे प्रात्यक्षिक भौतिकशास्त्रात आहे. अभियांत्रिकीसाठी सराव अधोरेखित करणारे मूलभूत ज्ञान गणित आणि भौतिकशास्त्र हे फार पूर्वीपासून आहे. या दोनही विषयाविना अभियांत्रिकीत प्रवेश म्हणजे नवकल्पनांवर नकारात्मक परिमाण होय. भावी अभियंते ठोस वैज्ञानिक पायाशिवाय योग्य अभियांत्रिकी करण्यात अक्षम ठरतील.
- संदीप वाघुळे, भौतिकशास्त्र, अमरावती विद्यापीठ
----------------------
अभियांत्रिकीचा पाया खिळखिळा करणारा निर्णय
एआयसीटीईने गणित, भौतिकशास्त्र अभ्यासक्रमाविना अभियांत्रिकीत प्रवेश घेता येणार आहे. या निर्णयामुळे अभियांत्रिकीचा पाया खिळखिळा होण्याची भीती तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या दोनही विषयांविना अभियांत्रिकीचे बेसिक ज्ञान मिळू शकणार नाही. भावी अभियंते पदवी मिळवतील; पण अभियांत्रिकीचे मूळ ज्ञान त्यांच्याकडे असणार नाही, असे मत तज्ज्ञांचे आहे.