विद्यापीठात पेंडालमध्ये मूल्यांकन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 06:00 IST2019-12-14T06:00:00+5:302019-12-14T06:00:36+5:30
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार परीक्षा संपल्याच्या दिवसापासून ४५ दिवसांत निकाल जाहीर करणे नियमावली आहे. मात्र, विद्यापीठात गत काही वर्षांपासून निकाल वेळेत जाहीर केले जात नाही. त्यामुळे परीक्षा व निकालात त्रुट्या, अनुपस्थिती असलेल्या परीक्षकांना पाच हजार रुपये दंड आणि सेवापुस्तिकेत नोंद, अशी कारवाई प्रस्तावित आहे.

विद्यापीठात पेंडालमध्ये मूल्यांकन सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या केंद्रीय मूल्यांकन विभागात पेंडालमध्ये परीक्षकांकडून मूल्यांकनाची कामे सुरू झाली आहे. शुक्रवारी ८१० परीक्षाकांनी उपस्थिती दर्शविल्याने पेंडालदेखील मूल्यांकनास कमी पडला, हे विशेष.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार परीक्षा संपल्याच्या दिवसापासून ४५ दिवसांत निकाल जाहीर करणे नियमावली आहे. मात्र, विद्यापीठात गत काही वर्षांपासून निकाल वेळेत जाहीर केले जात नाही. त्यामुळे परीक्षा व निकालात त्रुट्या, अनुपस्थिती असलेल्या परीक्षकांना पाच हजार रुपये दंड आणि सेवापुस्तिकेत नोंद, अशी कारवाई प्रस्तावित आहे. त्यामुळे हिवाळी २०१९ परीक्षेदरम्यान केंद्रावर केंद्राधिकारी, सहकेंद्राधिकाऱ्यांसह परीक्षकांनी मूल्यांकनास उपस्थिती दर्शविली. परीक्षा विभागात प्राध्यापकांची जणू यात्रा भरली, असे चित्र आहे. विद्यापीठ अंतर्गत पाचही जिल्ह्यांतून गर्दी झाल्याने परीक्षा विभागात मूल्यांकनास जागा अपुरी पडली. त्यामुळे परीक्षा विभागाने तात्काळ छतावर पेंडाल टाकला. गुरूवारपासून परीक्षकांनी पेंडालमध्ये मूल्यांकन सुरू केले आहे. शुक्रवारी पेंडालमध्येसुद्धा परीक्षकांना जागा अपुरी पडली. परिणामी परीक्षा विभागात मिळेल त्या ठिकाणी टेबल टाकून परीक्षकांना मूल्यांकन करावे लागले. येत्या काही दिवसांनंतर परीक्षकांची अधिक गर्दी वाढणार आहे. १५ जानेवारीपर्यंत परीक्षा सुरु असणार असल्याची माहिती आहे. एकीकडे परीक्षा आणि निकाल अशा दोनही बाबी एकाचवेळी सुरू आहे. त्यामुळे हिवाळी परीक्षेचे निकाल ४५ दिवसांच्या आत जाहीर होतील, असे संकेत आहे.
जागा अपुरी पडत असल्यामुळे मूल्यांकनाची व्यवस्था म्हणून छतावर पेंडॉल टाकण्यात आला आहे. येथे परीक्षकांना मूल्यांकनासाठी टेबल देण्यात आले आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून परीक्षेचे ‘एन्ड टू एन्ड’ आॅनलाईन कामे एजन्सीला दिली जाणार आहे.
- हेमंत देशमुख
संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ.