जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींची पर्यावरणात बाजी
By Admin | Updated: August 9, 2014 00:36 IST2014-08-09T00:36:35+5:302014-08-09T00:36:35+5:30
ग्रामीण भागाचा शाश्वत विकास करता यावा या दृष्टिकोनातून समृद्ध ग्रामविकास योजना राबविण्यात येते.

जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींची पर्यावरणात बाजी
अमरावती : ग्रामीण भागाचा शाश्वत विकास करता यावा या दृष्टिकोनातून समृद्ध ग्रामविकास योजना राबविण्यात येते. याची उकृष्टरीत्या अंमलबजावणी करणाऱ्या जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींची पर्यावरण विकासरत्न पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतीच्या सरपंच, सचिवांचा पुरस्कार देऊन १४ आॅगस्ट रोजी पुणे येथील बालेवाडी येथे होणाऱ्या गौरव कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत ग्रामीण भागाच्या विकासासाठी समृद्ध ग्रामविकास योजना मागील काही वर्षांपासून सुरू करण्यात आली. या योजनेत ग्रामपातळीवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पर्यावरणाच्या माध्यमातून समृद्ध विकास साधणाऱ्या जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींना यंदा शासनाकडून दिल्या जाणाऱ्या पर्यावरण विकासरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये अचलपूर तालुक्यातील देवगाव, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील घोडगाव, तिवसा तालुक्यातील चेनुष्टा, चांदूररेल्वे मधील चांदूरवाडी व भिलटेक या पाच ग्रामपंचायतीचा समावेश आहे. विकासरत्न पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या या ग्रामपंचायतीच्या सरपंच, सचिवांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री यांच्या हस्ते पर्यावरण विकासरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील १४ पंचायत समितींत ८४३ ग्रामपंचायती असताना पर्यावरण विकासरत्न पुरस्कारात केवळ पाच ग्रामपंचायतींनीच बाजी मारली.
याच ग्रामपंचायत विकासात पुढे आहेत. मात्र याप्रमाणे इतरही ग्रामपंचायतींनी यासाठी पुढाकार घ्यावा व यादृष्टीने लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनीही लक्ष देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)