'थर्टी फर्स्ट'चा आनंद घ्या, पण कायद्याच्या चाकोरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 05:00 IST2019-12-31T05:00:00+5:302019-12-31T05:00:26+5:30
कायद्याच्या चाकोरीत राहून 'थर्टी फर्स्ट'चा आनंद घ्या, नववर्षाचे उत्साहात स्वागत करा, पण दुसऱ्याला त्रास होईल, असे कृत्य टाळा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी दिला आहे. नववर्षाच्या स्वागतावेळी कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागू नये, याकरिता पोलिसांनी शहरात तगडा बंदोबस्त ठेवला आहे.

'थर्टी फर्स्ट'चा आनंद घ्या, पण कायद्याच्या चाकोरीत
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कायद्याच्या चाकोरीत राहून 'थर्टी फर्स्ट'चा आनंद घ्या, नववर्षाचे उत्साहात स्वागत करा, पण दुसऱ्याला त्रास होईल, असे कृत्य टाळा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी दिला आहे.
नववर्षाच्या स्वागतावेळी कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागू नये, याकरिता पोलिसांनी शहरात तगडा बंदोबस्त ठेवला आहे. पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या नेतृत्वात तीनही पोलीस उपायुक्त, १६ पीआय, ४० एपीआय व पीएसआय, ८०० पोलीस कर्मचारी तैनात असतील. चौकाचौकांत फिक्स पॉइंट, नाकाबंदी, विशेष पेट्रोलिंग पथक, दोन आरसीपी प्लॉटून सुरक्षेसाठी तैनात राहतील. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजतापासून १ जानेवारीच्या सकाळी ५ वाजेपर्यंत शहरात तगडा बंदोबस्त राहणार आहे.
'ब्रिथ अॅनॉलाईझर'द्वारे तपासणी
३१ डिसेंबरच्या रात्री तळीरामांची 'ब्रिथ अॅनॉलाईझर'ने तपासणी केली जाणार आहे. राजापेठ ते इर्विन आणि गाडगेनगर ते शिवाजी महाविद्यालयापर्यंतच्या उड्डाणपुलावर अपघात घडले आहेत. त्यामुळे यंदा दोन्ही उड्डाणपूल दुचाकीच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
रेकॉर्डवरील गुन्हेगारांना करणार 'डिटेन'
पोलीस रेकॉर्डवर गंभीर गुन्ह्यांच्या नोंदी असणाऱ्या आरोपींना ३१ डिसेंबर रोजी 'डिटेन' केले जाणार आहे. शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील १५० गुन्हेगारांना 'डिटेन' करून कोठडीत ठेवले जातील.
नववर्षाच्या स्वागतावेळी कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त राहणार आहे. नागरिकांनी नववर्षाचे स्वागत उत्साहात करावे, पण टवाळखोरपणा कदापि सहन केला जाणार नाही. कायद्याच्या चाकोरीत राहून जल्लोष करावा.
- संजयकुमार बाविस्कर, पोलीस आयुक्त