मुलांच्या वसतिगृहावर वन्यजीव विभागाचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:30 IST2020-12-12T04:30:07+5:302020-12-12T04:30:07+5:30

वन कर्मचाऱ्यांची मुले प्रतीक्षेत परतवाडा : मेळघाटातील अतिदुर्गम भागात कार्यरत वनकर्मचाऱ्यांच्या मुलांकरिता परतवाडा येथे बांधण्यात आलेल्या वसतिगृहावर मागील ११ ...

Encroachment of wildlife department on children's hostel | मुलांच्या वसतिगृहावर वन्यजीव विभागाचे अतिक्रमण

मुलांच्या वसतिगृहावर वन्यजीव विभागाचे अतिक्रमण

वन कर्मचाऱ्यांची मुले प्रतीक्षेत

परतवाडा : मेळघाटातील अतिदुर्गम भागात कार्यरत वनकर्मचाऱ्यांच्या मुलांकरिता परतवाडा येथे बांधण्यात आलेल्या वसतिगृहावर मागील ११ वर्षांपासून वन्यजीव विभागाचे अतिक्रमण आहे.

परतवाडा येथील वनविभागाच्या आवारात लाखो रुपये खर्च करून २००८ मध्ये ही वसतिगृहाची इमारत उभारली गेली. यात मुलांना राहण्याकरिता खोल्या आणि स्वतंत्र किचन आणि डायनिंगची व्यवस्थाही करण्यात आली. मुलांच्या राहण्याच्या अनुषंगाने आवश्यक सर्व सोयी व वसतिगृहात उपलब्ध करून दिल्या गेल्यात. मुलांचे वसतिगृह म्हणूनच ही इमारत साकारली गेली.

वसतिगृहाची इमारत पूर्ण झाल्यानंतर सन २००८-०९ मध्ये उपवनसंरक्षकांनी अधिनस्त वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना याची माहितीही कळविली. वनपाल-वनरक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनाही या पत्राच्या प्रती दिल्या गेल्यात.

मेळघाट क्षेत्रात काम करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक दृष्टीकोनातून परतवाडा मुख्यालयी एक शासकीय वसतिगृह बांधण्यात आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांची मुले ही इयत्ता ७ ते १२ या वर्गात शिकत आहेत, त्यांनी या वसतिगृहाचा त्यांचे पाल्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने राहण्याच्या सोयीचा फायदा घ्यावा, असे नोव्हेंबर २००८ च्या पत्रात उपवनसंरक्षक सिपना वन्यजीव विभाग परतवाडा यांनी म्हटले आहे. पण २०२० संपायला आले असले तरी ते वसतिगृह सुरू करण्यात आलेले नाही.

११ वर्षांपासून अतिक्रमण

परतवाडा येथे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल व सिपना वन्यजीव विभागाचे कार्यालय ११ वर्षांपूर्वी एकाच इमारतीत दोन स्वतंत्र भागात होते. वसतिगृहाची इमारत २००८ मध्ये पूर्ण होताच गुगामल वन्यजीव विभागाने आपले बस्तान, वसतिगृहाच्या इमारतीत हलविले. मागील दीड-दोन वर्षांपूर्वी गुगामल वन्यजीव विभागाचे कार्यालय चिखलदऱ्यात हलविले गेले आणि या वसतिगृहाच्या इमारतीत मेळघाट वन्यजीव विभागाच्या विभागीय वनाधिकाऱ्यांचे कार्यालय थाटो गेले. यात अधिकारी बदललेत, कार्यालयाचे नाव बदलले, पण मुलांकरिता बांधल्या गेलेले वसतिगृह मुलांना अजूनही उपलब्ध होऊ शकले नाही. या इमारतीवरील आपले अतिक्रमण मागील ११ वर्षांपासून वन्यजीव विभागाने कायम ठेवले आहे.

Web Title: Encroachment of wildlife department on children's hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.