सेमाडोह येथील घरे हत्तीने पाडण्याची धमकी, मेळघाटात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 04:49 IST2020-03-07T04:49:03+5:302020-03-07T04:49:09+5:30
आदिवासींची घरी हत्तीद्वारे पाडण्याची ताकीद दिल्याची तक्रार मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे नोंदविली.

सेमाडोह येथील घरे हत्तीने पाडण्याची धमकी, मेळघाटात खळबळ
चिखलदरा (अमरावती) : सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक शिवबाला एस. यांनी शुक्रवारी सकाळी सेमाडोह येथे जाऊन तेथील आदिवासींची घरी हत्तीद्वारे पाडण्याची ताकीद दिल्याची तक्रार मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे नोंदविली. सेमाडोह येथील पंधरा ते वीस वर्षांपासून गावठाण सर्वे नंबर ५४ व ४१ वर राहणाऱ्या आदिवासींकडे शासकीय नियमानुसार ग्रामपंचायत कराचा भरणा केल्याच्या पावत्या व घर नमुना ८ अशी सर्व कागदपत्रे आहेत.
शिवबाला एस. आपल्या ताफ्यासह आले व त्यांनी हत्तीद्वारे झोपड्या व घरे पाडण्याची धमकी दिली. यामुळे आदिवासींमध्ये दहशत पसरल्याचे आ. पटेल यांनी तक्रारीत नमूद केले आहे. होळी साजरी करण्यासाठी आदिवासींची लगबग सुरू असताना, अचानक उपवनसंरक्षकांनी येऊन केलेला
प्रकार संतापजनक आहे. यावर तात्काळ स्थगनादेश देण्याची मागणी आमदारांकडून करण्यात आली आहे.
>प्रधान मुख्य वनसंरक्षक व संबंधित उपवनसंरक्षकांंकडून यासंदर्भात संपूर्ण माहिती मागविण्यात आली. ती माहिती येईपर्यंत कुठलीच कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत.
- संजय राठोड, वनमंत्री