वीज चोरटे महावितरणच्या रडारवर, शहरात आठ महिन्यात २२८ जणांकडून ६४ लाखांचा दंड वसूल
By उज्वल भालेकर | Updated: September 10, 2023 18:26 IST2023-09-10T18:25:58+5:302023-09-10T18:26:50+5:30
जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात ३१४ वीज चोरी प्रकरणात कारवाई केली असून त्यांना १ कोटी १ लाख ६१ हजार १६ रुपये दंड आकारण्यात आला होता.

वीज चोरटे महावितरणच्या रडारवर, शहरात आठ महिन्यात २२८ जणांकडून ६४ लाखांचा दंड वसूल
अमरावती : शहरातील वीज चोरीच्या घटना थांबविण्यासाठी महावितरण ॲक्शन मोडवर आहे. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात ३१४ वीज चोरी प्रकरणात कारवाई केली असून त्यांना १ कोटी १ लाख ६१ हजार १६ रुपये दंड आकारण्यात आला होता. यातील २२८ जणांकडून ६३ लाख ९३ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. ८६ प्रकरणात कायदेशीर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.
अमरावती परिमंडळ वीज चोरीपासून मुक्त करण्यासाठी मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांनी वीज चोरी विरोधात सतत मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने वीज चोरटे हे महावितरणच्या रडारवर आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अमरावती शहर विभागाकडून कार्यकारी अभियंता आनंद काटकर यांच्या मार्गदर्शनात कारवायांचा धडाका सुरू आहे. यामध्ये वीज चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात महावितरणला यश आले आहे. प्रत्येक घरात उजेड असावा, त्यापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी महावितरणकडून घरोघरी विद्युत मीटर लावून वीजपुरवठा करते. त्यामुळे वीज वापरा पोटी दरमहा आकारण्यात येणारे देयक ग्राहकांनी न चुकता अदा करावे असे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरामध्ये विविध ठिकाणी वीज प्रवाहित वाहिनीवर आकोडे टाकून किंवा मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी करण्याचा प्रकार उघड होत आहेत.