विजेची देयके उशिरा हाती महावितरणची लूट माथी
By Admin | Updated: November 3, 2014 23:17 IST2014-11-03T23:17:31+5:302014-11-03T23:17:31+5:30
जिल्ह्यात चार लाख ग्राहकांना वीज पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लि. (महावितरण) च्यावतीने किमान ६० टक्के ग्राहकांच्या हाती उशिरा देयके दिली जात आहेत.

विजेची देयके उशिरा हाती महावितरणची लूट माथी
लाखोंचा डल्ला : जिल्ह्यात चार लाख वीज ग्राहकांची नोंद
गणेश वासनिक -अमरावती
जिल्ह्यात चार लाख ग्राहकांना वीज पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लि. (महावितरण) च्यावतीने किमान ६० टक्के ग्राहकांच्या हाती उशिरा देयके दिली जात आहेत. त्यामुळे अंतिम तारखेनंतर देयके भरण्याचा प्रसंग ग्राहकांवर ओढावत असल्याने विलंब आकाराच्या भुर्दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणात जमा होत आहे. वीज ग्राहकांची लूट करण्यासाठी जणू महावितरणने देयके वाटप करणाऱ्या कंत्राटदारांसोबत हातमिळवणी केल्याचा सूर उमटू लागला आहे.
स्थिर आकार, वीज आकार, वीज शुल्क, इंधन समायोजन आकार, एलबीटी, वीज विक्री आकार, व्याज असे वेगवेगळ्या आकारात समायोजन करुन ग्राहकांच्या हाती वीज देयके दिली जातात. अव्वाच्या सव्वा देयके आकारली जात असताना ही देयके ग्राहकांच्या हाती विलंबाने पडत असल्याने देयके वेळेपूर्वी अदा करणे कठीण होते. त्यामुळे विलंबाने देयके भरण्याचा प्रसंग अनेक ग्राहकांवर ओढवत आहे.
एकट्या महानगरात १ लाख ४० हजार वीजग्राहक आहेत. यापैक ी ६० टक्के वीज ग्राहक विलंबाने देयके भरत असतील तर महावितण कंपनीकडे महिन्याकाठी प्रत्येक ग्राहकांकडून एका देयकामागे २० ते ८० रुपयांपर्यत विलंब आकाराची रक्कम जमा होते. ही रक्कम महिन्याला लाखोंच्या घरात जाते, हे वास्तव आहे.
हीच परिस्थिती ग्रामीण भागातही आहे. ग्रामीण भागात २ लाख ६० हजार वीज ग्राहक आहेत. दोन ते तीन दिवसांच्या फरकावर वीज देयके ग्राहकांना हाती मिळत असेल तर ग्रामीण भागातील गोरगरीब देयके भरण्यासाठी कशी व्यवस्था करणार? हा खरा सवाल यानिमित्त्याने पुढे आला आहे. वीज ही प्रत्येकाची गरज झाल्यामुळे शहर असो की ग्रामीण भागातील ग्राहक विलंब आकाराने वीज देयके अदा करुन महावितरणच्या घशात दर महिन्याला अतिरिक्त स्वरुपात लाखोंची रक्कम ओतत आहे. वर्षाकाठी हा आकडा कोट्यवधींच्या घरात जात असून, प्रत्येक वीज ग्राहक दर महिन्याला उशिरा देयके हाती येत असताना ती निमूटपणे स्वीकारुन विलंबाने देयके अदा करीत असल्याचे दिसून येते. मात्र याप्रकरणी महावितरण ‘तेरी भी चुप, मेरी भी चुप’ असे सोंग घेत वर्षाकाठी ग्राहकांच्या खिशाला कोट्यवधी रुपयांची कात्री लावत आहेत. विलंबाने देयके वाटप करण्याचा प्रकार सर्रासपणे सुरु असताना महावितणच्या अधिकाऱ्यांकडून बघतो, पाहून घेतो, अभियंत्याला सांगतो, अशी उडवा- उडवीची उत्तरे सामान्यांना दिली जात आहेत. विलंबाने वीज देयके देण्याचा प्रकार टाळावा व ग्राहकांची होत असलेली लूट थांबवावी, अशी मागणी होत आहे.