प्रस्थापितांना निवडणुकीचे आव्हान तगडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 06:00 AM2019-08-24T06:00:00+5:302019-08-24T06:00:44+5:30

बडनेऱ्यातून रवि राणा हे दुसऱ्यांदा अपक्ष आमदार आहेत. अकरा वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके यांना हरवून आता प्रस्थापित झालेल्या रवि राणा यांची नाव यावेळी हेलकावे घेत आहे. शिवसेनेचे दिवंगत नेता संजय बंड यांच्या अकाली जाण्याने निर्माण झालेली सहानुभूतीची भावना रवि राणा यांच्यासाठी मोठा अडसर आहे.

Election Challenges Strong! | प्रस्थापितांना निवडणुकीचे आव्हान तगडे!

प्रस्थापितांना निवडणुकीचे आव्हान तगडे!

Next
ठळक मुद्देनवागतांची रांग मोठी : युतीबाबतचा संभ्रम कायम, सर्वच पक्षांचे 'कामाला लागा'चे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पहिल्यांदाच निवडून आलेल्या जिल्ह्यातील दोन आमदारांव्यतिरिक्त इतर सहा प्रस्थापित आमदारांना यावेळची निवडणूक तुलनात्मकदृष्ट्या आव्हानात्मक आहे. युतीबाबतची संभ्रमावस्था आणि इच्छुकांची लांबच लांब यादी हे मुद्दे निवडणुकीचे गांभीर्य वाढविणारे ठरले आहेत. सर्वच पक्षांनी कामाला लागण्याचे आदेश दिल्याने लगबग वाढली आहे.
बडनेऱ्यातून रवि राणा हे दुसऱ्यांदा अपक्ष आमदार आहेत. अकरा वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके यांना हरवून आता प्रस्थापित झालेल्या रवि राणा यांची नाव यावेळी हेलकावे घेत आहे. शिवसेनेचे दिवंगत नेता संजय बंड यांच्या अकाली जाण्याने निर्माण झालेली सहानुभूतीची भावना रवि राणा यांच्यासाठी मोठा अडसर आहे. राष्ट्रवादी समर्थित अपक्ष खासदार नवनीत रवि राणा यांनी संधी मिळेल तेव्हा भाजपक्षाशी दाखविलेली जवळीक मुस्लिम मतदारांना दूर लोटणारी आहे. मूळ भाजपचे तुषार भारतीय कामाला लागले आहेत, तर प्रीती बंड यांनी शिवसेनेकडून उमेदवारी घ्यावी, असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा पराकोटीचा आग्रह आहे. रवि राणा यांना हरविण्यासाठी जिल्हाभरातील त्यांचे शत्रू बडनेरा मतदारसंघात छुपी ताकद वापरण्याची चिन्हे असल्याने हा मतदारसंघ रंगतदार लढतीचा ठरणार आहे.
अमरावती मतदारसंघात पूर्वाश्रमीचे काँग्रसमधील राज्यमंत्री असलेले सुनील देशमुख हे भाजपचे आमदार आहेत. सलग नसली तरी त्यांची ही तिसरी टर्म आहे. सत्तेसाठी त्यांनी पक्षबदल केला. वागणुकीत काँग्रेसची छाप असलेले सुनील देशमुख भाजपजनांना आपलेसे वाटत नाहीत. शहर भाजपात देशमुखांविरुद्ध नाराजी आहे. बाहेरून आलेल्या नेत्याला पक्षाने महत्त्व का द्यावे, हा मुद्दा उपस्थित करून उमेदवार बदलवून देण्यासाठी पक्षातील काहींनी श्रेष्ठींकडे धोशा लावला आहे. काँग्रेसचे रावसाहेब शेखावत अचानक शांत झाले आहेत. राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके यांनी अमरावतीतून निवडणूक लढविण्याची घोषणा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
केवळ पाच हजारांच्या फरकाने निवडून आलेले बच्चू कडू यांच्यासाठी आता अचलपूर जिंकणे आव्हानात्मक आहे. तीनवेळा आमदारकी भूषविणारे बच्चू कडू यांचे जसे चाहते, तसे विरोधकही मतदारसंघात तयार झाले आहेत. बदल हवा, हा मुद्दा मतदारसंघात चर्चेत आणला जात आहे. राज्यभरात पक्षबांधणीसाठी फिरणारे कडू मतदारसंघात कमी उपलब्ध असतात. काँग्रेसचे बबलू देशमुख, आरपीआयचे राजेंद्र गवई, भाजपतर्फे डॉ. राजेंद्र उभाड हे इच्छुक आहेत. माळी मतांचा प्रभाव असलेल्या या मतदारसंघात माळी उमेदवार द्यावा, अशी त्या समाजाची मागणी आहे.
मोर्शी मतदारसंघ पालकमंत्री अनिल बोंडे यांचा आहे. त्यांना यावेळची निवडणूक अडचणीची असल्याच्या बातम्या त्यांच्या मतदारसंघातून वारंवार येत असतात. अमरावतीत वास्तव्यास असलेल्या बोंडेंना वरूड-मोर्शीतून निवडून द्यायचे तरी का, हा निवडणुकीचा मुख्य मुद्दा होऊ शकतो. संत्र्याच्या बागा असलेल्या त्यांच्या मतदारसंघातील शेतकरी पाण्याविना, दराविना, प्रक्रिया केंद्राविना अडचणीत आहेत. त्याचा फटका बोंडे यांना बसण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन देशमुख, काँग्रेसमध्ये असलेले पिता-पुत्र नरेश्चंद्र आणि विक्रम ठाकरे, शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे देवेंद्र भुयार यांनी बोंडे यांच्यापुढे आव्हान निर्माण केले आहे.
तिवसा मतदारसंघातून जिल्ह्यातील एकमेव महिला आमदार यशोमती ठाकूर या दुसºयांदा प्रतिनिधित्व करीत आहेत. अखिल भारतीय काँग्रेसच्या त्या सचिव आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आहेत. भाजपच्या अनेकांना तिवस्यातून निवडणूक लढवायची आहे. रविराज देशमुख, निवेदिता चौधरी, दिनेश सूर्यवंशी, अजय पांडे, आसावारी देशमुख यांनी कंबर कसली आहे. शिवसेनेचे नाना वानखडे प्रबळ दावेदार आहेत. शिवसेनेच्या प्रीती बंड यांना तिवस्यातून लढविण्याचे प्रयत्नही राजकीय पटलावर सुरू आहेत.
धामणगाव रेल्वे मतदारसंघातून काँग्रेसचे वीरेंद्र जगताप तिसºयांदा आमदार आहेत. यापूर्वी मोदी लाटेतही तरलेल्या जगतापांना यावेळी आव्हान मोठे आहे. भाजपचे विधान परिषद सदस्य अरुण अडसड त्यांच्या नगराध्यक्ष पुत्रासाठी प्राणपणाने कामी लागले आहेत. पूर्वी जगताप यांचा उजवा हात असलेल्या नीलेश विश्वकर्मा या युवकाने अचानक उमेदवारी घोषित केली. तिकीट कुण्या पक्षाचे, हे निश्चित व्हायचे असले तरी प्रवीण घुईखेडकर, अभिजित ढेपे हे ग्रामीण जनतेशी नाळ जुळलेले नेते मैदानात आहेत. फ्रेश चेहरा असलेले भाजपचे नितीन धांडे ताकदीनिशी उतरले आहेत.
मेळघाट मतदारसंघ जरा वेगळ्या धाटणीचा आहे. प्रभुदास भिलावेकर हे तेथून भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार आहेत. राष्ट्रवादीतून राजकुमार पटेल आणि काँग्रेसचे केवलराम काळे यांना निवडणूक लढावयाची आहे. उपायुक्त असलेले रमेश मावस्कर यांना भाजपक्षाकडून उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता आहे.
दर्यापूर हा एससी राखीव मतदारसंघ आहे. रमेश बुंदिले हे तेथून पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावर आमदार आहेत. पुण्याच्या सीमा साळवे यांनी त्या मतदारसंघातून तयारी सुरू केली आहे. भाजपने तिकीट दिले तरच लढू, असा त्यांना निर्णय आहे. अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या हाती दर्यापूर भाजपची चावी आहे. बळवंत वानखेडे हे आरपीआयचे उमेदवार आहेत. ‘गोल्ड मॅन’ अशी ओळख असलेले, अंगभर सोने घालणारे पुण्याचे अमित मेश्राम यांनाही या मतदारसंघातून उमेदवारी हवी आहे.

Web Title: Election Challenges Strong!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.