अमरावती जिल्ह्यातील आठ विद्यार्थी अडकले युक्रेनमध्ये, बंकरमध्ये वास्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 21:31 IST2022-02-25T21:31:21+5:302022-02-25T21:31:59+5:30
Amravati News ¯ वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले अमरावती जिल्ह्यातील आठ विद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत.

अमरावती जिल्ह्यातील आठ विद्यार्थी अडकले युक्रेनमध्ये, बंकरमध्ये वास्तव्य
अमरावती : वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले आठ विद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. त्यांना भारतात परतीसाठी युक्रेनच्या बाॅर्डर पलीकडे पोलंड व रुमानिया या देशात जाण्याच्या सूचना दूतावासातर्फे देण्यात आल्याचे या विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, या आठही विद्यार्थ्यांची माहिती जिल्हा प्रशासनाद्वारा मंत्रालय कक्षाला व तेथून भारतीय दूतावासाला देण्यात आलेली आहे.
या विद्यार्थ्यांमध्ये अभिषेक बारब्दे, प्रणव फुसे, साहिर तेलंग, तुषार गंधे, तनिष्क सावंत, वृषभ गजभिये, स्वराज्य पुंड व प्रणव भारसाकळे यांचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये पोलीस व महसूल विभागाने ही माहिती गोळा केली आहे. तसेच काहींच्या पालकांनी देखील नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली.
आमच्या हॉस्टेलच्या बेसमेंटमध्ये तात्पुरता बंकर करण्यात येऊन आम्हाला ठेवण्यात आलेले आहे. बाहेरचा संपर्क नाही. ‘रेडी टू इट’ जेवण मिळत आहे. किवीपासून २०० किमी अंतरावरील व्हिनितसिया शहरात आहोत. येथे सकाळी बॉम्ब टाकण्यात आले. आम्ही खूप घाबरलो आहे. पॅनिक झालो असल्याचे स्वराज पुंड यांनी सांगितले.