आठ कैदी पोलीस कोठडीत गेले अन् कोरोना घेऊन आले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:19 IST2021-02-23T04:19:55+5:302021-02-23T04:19:55+5:30
अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहात गत १५ दिवसांपूर्वी एकही कैदी कोरोना बाधित नव्हता; मात्र आठ कैदी पोलीस कोठडीत ...

आठ कैदी पोलीस कोठडीत गेले अन् कोरोना घेऊन आले
अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहात गत १५ दिवसांपूर्वी एकही कैदी कोरोना बाधित नव्हता; मात्र आठ कैदी पोलीस कोठडीत गेले आणि कोरोना घेऊन आले. यात दोन कैदी सुपर स्पेशालिटीत दाखल, पाच कैदी क्वारंटाईन केंद्रात उपचार घेत आहेत. मध्यवर्ती कारागृहात अचानक कोरोनाची ‘एण्ट्री’ झाल्यामुळे कोरोनाची भीती वाढली असून, नियमावलीचे कठोर पालन करण्यात येत आहे.
१ मे २०२० ते जानेवारी २०२१ या दरम्यान कारागृहात १६५ कैदी संक्रमित आढळले होते. त्यापैकी एक कर्मचारी, एक कैदी असे दाेघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. येथील मध्यवर्ती कारागृहात कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी ३० एप्रिल २०२० पासून कठोर नियमावली लागू केली. जुन्या कारागृहात कैद्यांना प्रवेश देण्यापूर्वी अगोदर कोरोना चाचणी, तात्पुरत्या कारागृहात १४ दिवस क्वारंटाईन ही नियमावली आजही कायम आहे. त्या अनुषंगाने न्यायालयीन आठ कैदी बांधवांना चौकशीसाठी पोलीस कोठडीत ताब्यात घेतले. तीन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर तात्पुरता कारागृहात गत आठ दिवसांपूर्वी हे कैदी परत आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली असताना ते बाधित आढळून आले आहे. परिणामी, या आठही कैद्यांवर कोरोनाचा उपचार सुरू आहे. यातील दोन कैदी येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल आहे, तर पाच कैदी होम गार्डच्या विभागीय कार्यालयात साकारण्यात आलेल्या क्वारंटाईन केंद्रामध्ये वैद्यकीय चमूच्या देखरेखीत आहेत.
-------------------
कोरोना नियमांचे काटेकोर पालन
जिल्ह्यात कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ झाला असताना येथील मध्यवर्ती कारागृहात कोरोना नियमांचे कठोर पालन होण्यासाठी बंधने लादली आहेत. नवीन कैद्यांना जुन्या कारागृहात प्रवेशापूर्वी १४ दिवस क्वारंटाईन अनिवार्य केले आहे, तसेच नवीन कैद्यांची कोरोना चाचणी बंधनकारक असून, नातेवाइकांची बंदीजनांसोबतची भेट बंद आहे. कैद्यांना नातेवाइकांकडून कपडे, स्वेटर व अन्य पोषाख घेण्यास मनाई आहे. कारागृहात कैदी गर्दी करणार नाही, यची दक्षता बाळगली जात आहे. बराकीत शारीरिक अंतर ठेवले जात आहे. सॅनिटायझरचा वापर, हॅण्डवॉश, सुरक्षित अंतराला प्राधान्य दिले जात आहे.
--------------------------
गत आठवड्यात पोलीस कोठडीत काही कैदी गेले होते. त्यापैकी आठ कैदी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यात दोन कैदी
सुपर स्पेशालिटी तर पाच कैदी होमगार्डच्या क्वारंटाईन केंद्रात ठेवण्यात आले आहे. आठही कैद्यांची प्रकृती स्थिर असून, कोरोना नियमावलींचे पालन बंधनकारक केले आहे.
- एफ. आय. थोरात, वैद्यकीय अधिकारी, मध्यवर्ती कारागृह