प्रदीप भाकरे
अमरावती : शहर पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांना आठ तास ड्युटी देण्याचा निर्णय पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी घेतला आहे. २३ सप्टेंबरपासून त्या निर्णयाची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. अमरावती शहर आयुक्तालयातील सुमारे २७५ महिला पोलीस अंमलदारांना या निर्णयाचा लाभ होईल.
नागपूर शहरात महिला पोलिसांना प्रायोगिक तत्त्वावर आठ तास ड्युटीचा उपक्रम सुरू केल्यानंतर पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी अन्य पोलिस घटकांनी या निर्णयाबाबत विचार करावा, अशी सूचना केली होती. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनीही महिला पोलिसांसाठी आठ तासांची ड्युटी जाहीर केली आहे. त्यापाठोपाठ असा निर्णय घेऊन त्यावर अंमलबजावणी करणारे अमरावती शहर आयुक्तालय तिसरे पोलीस घटक बनले आहे.
पोलीस दलात कर्तव्य करीत असलेल्या महिलांना १२ तास काम करावे लागते. त्यांना कामाबरोबरच कौटुंबिक जबाबदारी पार पाडावी लागते. अनेक वेळा सण, उत्सव, बंदोबस्त, गंभीर गुन्हे या निमित्ताने वर्षभरातून अनेक वेळा १२ तासांपेक्षा जास्त कर्तव्य बजावावे लागते. त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जबाबदारीवर आणि कर्तव्यावरही परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नागपूर पोलीस आयुक्तालयात पहिल्यांदा प्रायोगिक तत्त्वावर हा निर्णय लागू करण्यात आला.
आता अमरावती शहर पोलीस दलातील महिलांनाही २३ सप्टेंबरपासून आठ तासच कर्तव्य करावे लागणार आहे. या निर्णयाचे महिला पोलिसांनी जोरदार स्वागत केले आहे. शहर आयुक्तालयात तूर्तास १९०९ पैकी १७०३ पोलीस अंमलदार कार्यरत आहेत. त्यात २७५ च्या घरात महिला पोलीस अंमलदार आहेत.
पोलीस महासंचालकांनी महिला पोलिसांना येणाऱ्या अडचणींचा सहानभुतीपूर्वक विचार करून आठ तास ड्युटीच्या निर्णयाबाबत इतर घटकांनी विचार करावा, असे सुचविले होते. त्यानुसार गणेश विसर्जनानंतर शहर पोलीस दलात प्रायोगिक तत्त्वावर महिला पोलिसांना आठ तास ड्युटीच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे.
डॉ. आरती सिंह, पोलीस आयुक्त, अमरावती
महिला पोलिसांवर ड्युटीसह कौटुंबिक जबाबदारी असते. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी घेतलेला आठ तास ड्युटीचा निर्णय आम्हा महिला पोलिसांसाठी खूपच स्तुत्य आहे. आम्ही आपाद स्थितीत पोलीस म्हणून २४ तास कामावर असतोच. या निर्णयामुळे कुटुंबालाही वेळ देता येणे शक्य आहे.
एक महिला पोलीस, शहर आयुक्तालय