शिरजगाव कोरडे गावात ठिकठिकाणी लागले शैक्षणिक चार्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:12 IST2020-12-24T04:12:56+5:302020-12-24T04:12:56+5:30
फोटो - चांदूर रेल्वे जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम, ६८ गावांत अभियानाला सुरुवात, शिक्षकांचा सहभाग चांदूर रेल्वे : अँड्रॉईड मोबाईल ...

शिरजगाव कोरडे गावात ठिकठिकाणी लागले शैक्षणिक चार्ट
फोटो - चांदूर रेल्वे
जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम, ६८ गावांत अभियानाला सुरुवात, शिक्षकांचा सहभाग
चांदूर रेल्वे : अँड्रॉईड मोबाईल नसल्याने कोरोनाकाळात शिक्षणात खंड पडण्यासह विद्यार्थ्यांचे मन खट्टू होण्याच्या घटना घडत आहेत. खेडेगावात तर कनेक्टिव्हिटी नसल्याने शिक्षणच ठप्प झाले आहे. त्यावर उपाय म्हणून शिरजगाव कोरडे या गावात जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेच्या शिक्षकांनी ठिकठिकाणी चार्ट लागले आहेत. हा उपक्रम तालुक्यातील ६८ शाळांमार्फत गावागावांत राबविला जात आहे.
कोरोना संक्रमणाला प्रारंभ होऊन आता १० महिन्यांचा कालावधी होत आहे. त्यामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या. २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू केल्या आहेत. परंतु, पहिली ते आठवीच्या शाळा अजूनही बंदच आहेत. ‘शाळा बंद, पण शिक्षण सुरू’ या राज्य शासनाच्या उपक्रमाद्वारे व्हाॅट्सॲपद्वारे ऑनलाईन शिक्षण, गोष्टीचा शनिवार, शाळाबाहेरची शाळा, शिक्षकमित्र या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहे. परंतु, खेड्यातील सर्वच पालकांजवळ अँड्रॉईड मोबाईल उपलब्ध नसल्यामुळे पेच निर्माण होत आहे. त्यामुळे ‘शिक्षण विद्यार्थ्यांच्या दारी’ या उपक्रमांतर्गत शिरजगाव कोरडे येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेच्या शिक्षकांनी विविध प्रकारचे शैक्षणिक चार्ट गावातील चौकाचौकांत, किराणा दूकानाजवळ तसेच मुले ज्या ठिकाणी खेळतात अशा ठिकाणी लावले. या लावलेल्या शैक्षणिक चार्टमुळे शाळेत जाणारी मुले शैक्षणिक
प्रवाहात टिकून राहण्यास उत्तम प्रकारे मदत होत आहे.
शिरजगाव कोरडेप्रमाणेच चांदूर रेल्वे तालुक्यातील ६८ गावामध्ये हा उपक्रम राबविला जात आहे. चांदूर रेल्वे पंचायत समीतीचे गटशिक्षणाधिकारी मुरलीधर राजनेकर तसेच शिरजगाव येथील केंद्राच्या अरुणा दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शिक्षण विद्यार्थ्यांच्या दारी’ हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. येथील मुख्याध्यापक राजेंद्र वानखडे, राजेंद्र तामस्कर, किशोर बकाले, निरंजन चव्हाण, प्रणिता कडवे या सर्वांनी परिश्रम घेतले.