शिक्षण विभागातील अधिकारी कारवाईच्या रांगेत
By Admin | Updated: August 28, 2015 00:35 IST2015-08-28T00:35:43+5:302015-08-28T00:35:43+5:30
शिक्षण आयुक्तपदाचा कार्यभार स्वाकारल्यापासून आठ अधिकाऱ्यांना निलंबित केले.

शिक्षण विभागातील अधिकारी कारवाईच्या रांगेत
अमरावती : शिक्षण आयुक्तपदाचा कार्यभार स्वाकारल्यापासून आठ अधिकाऱ्यांना निलंबित केले. त्यात अमरावतीच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांचाही समावेश आहे. नुसते उपसंचालकच नव्हे, तर शिक्षण विभागातील अनेक अधिकारी कारवाईच्या रांगेत आहेत. जे दोषी आढळतील त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
अमरावती दौऱ्यावर आले असता पुरुषोत्तम भापकर हे विभागीय आयुक्त कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांपासून सर्वांनीच स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. शिक्षण विभागात अधिकाऱ्यांपासून शिक्षकांपर्यंत घटकांची जबाबदारी निश्चित करण्याचे काम सुरू आहे. प्रत्येकाची जबाबदारी ठाम आणि तो सक्षमपणे पार पाडतो की नाही यासाठी की रिझल्ट एरिया (केआरए) पद्धती अवलंबिली जात आहे. आता एका क्लिकवर सर्वांची कुंडली उघड होईल, शिक्षण विभागातील विविध अधिकाऱ्यांची चौकशी प्रलंबित होती. ती मार्गी लावण्याचे काम सुरू आहे. ज्या-ज्या ठिकाणी गैरव्यवहार झालेत त्याची चौकशी झाली. पण, कारवाईसाठी ठोस यंत्रणा नसल्याने चौकशी होऊनही संबंधित अधिकारी नामानिराळे राहायचे. यातील काही अधिकारी सेवानिवृत्तीला आले तरी त्यांच्यावरील कारवाई प्रलंबित राहायची. अलीकडे ती कारवाई झाली त्यात सेवानिवृत्तीला पोहोचलेल्यांचाही समावेश आहे. एकदा निवृत्त झाले की आपले कुणी काही बिघडवू शकत नाही, असा गैरसमज कुणी करून घेऊ नये. यानिमित्ताने संदेश देण्याचे काम झाले. राज्यात एकही विद्यार्थी अप्रगत राहू नये, असा राज्य शासनाचा प्रयत्न असून आम्ही त्यादृष्टीने पावले टकत आहोत. एखाद्या शाळेत चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी अप्रगत राहिल्यास संबंधितांना जाब विचारला जाईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)