अत्यवस्थेत आढळला गरुड पक्षी
By Admin | Updated: October 22, 2015 00:19 IST2015-10-22T00:19:15+5:302015-10-22T00:19:15+5:30
दुर्मिळ होत चाललेला गरुड पक्षी मंगळवारी सायंकाळी वडाळी परिसरात अत्यवस्थेत आढळून आला आहे.

अत्यवस्थेत आढळला गरुड पक्षी
दुर्मिळ प्रजातीचा पक्षी : विषबाधा झाल्याचा वन्यप्रेमींचा संशय
अमरावती : दुर्मिळ होत चाललेला गरुड पक्षी मंगळवारी सायंकाळी वडाळी परिसरात अत्यवस्थेत आढळून आला आहे. वनविभागाने गरूडाला वन्यजीव अभ्यासक राघवेंद्र नांदे यांच्याकडे उपचाराकरिता सोपविले आहे. गरूडाला अन्नपदार्थातून विषबाधा झाल्याचा संशय वन्यप्रेमीने वर्तविला आहे.
गरुड दुर्मिळ प्रजाती मोडणारा पक्षी असून तो मासांहारी पक्षी आहे. मांस हे मुख्य खाद्य असल्याने तो लहान पक्षी व सरपटणाऱ्या प्राणी खाऊन जगतो. मात्र, काही वर्षांपासून गरूड दिवसेदिवस कमी होत आहेत. हवामान बदल व प्रदूषित वातावरणामुळे गरुडाला योग्य खाद्य मिळत नसल्यामुळे गरुडांची संख्या कमी होत असल्याचे वन्यप्रेमीकडून सांगण्यात येत आहे. मंगळवारी सायंकाळी वडाळीतील काही युवकांना गरुड अत्यवस्थेत आढळून आला. त्यांनी गरूडाला वडाळी वनपरिक्षेत्रातील वनपाल विजय बारब्दे यांच्याकडे सोपविले होते. गरुडाला विद्युत प्रवाहाचा झटका बसला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभाग अधिकाऱ्यांनी वर्तविला. गरुडाला उपचाराकरिता कार्स संस्थेचे राघवेंद नांदे यांच्याकडे सोपविले. मात्र, गरुड उलट्या करीत असल्यामुळे त्याला विषबाधा झाल्याचा अंदाज राघवेंद्र नांदे यांनी काढला आहे. सद्यस्थितीत गरुडाची प्रकृती गंभीर असून त्यावर योग्य उपचार सुरु आहेत.
वडाळी भागातील काही युवकांनी गरुड पक्ष्याला वनविभागाकडे सोपविले आहे. त्याला विद्युत प्रवाहाच्या झटका लागल्याचे सांगण्यात आले आहे. गरुडाला उपचाराकरिता राघवेंद्र नांदे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
-विजय बारब्दे
वनपाल, वडाळी वनपरिक्षेत्र कार्यालय.
गरुड पक्ष्यावर उपचार सुरु केले आहेत. मात्र, तो उलट्या करीत असल्यामुळे त्याला विषबाधा झाल्याचे दिसून येत आहे. तो हालचाल कमी असून त्यांच्यावर उपचार सुरु केले आहे.
- राघवेंद्र नांदे,
वन्यजीव अभ्यासक. कार्स संस्था