कैद्यांची कुटुंबीयांसोबत 'ई-मुलाखत' : गुगलवर 'ई-प्रिझन' या संकेतस्थळावर करावी लागते नोंदणी

By गणेश वासनिक | Updated: February 17, 2025 14:01 IST2025-02-17T14:01:27+5:302025-02-17T14:01:49+5:30

Amravati : वेळेची बचत अन् त्रासही कमी

'E-interview' of prisoners with their families: Registration is required on the 'e-Prison' website on Google | कैद्यांची कुटुंबीयांसोबत 'ई-मुलाखत' : गुगलवर 'ई-प्रिझन' या संकेतस्थळावर करावी लागते नोंदणी

'E-interview' of prisoners with their families: Registration is required on the 'e-Prison' website on Google

अमरावती : कारागृहात बंदिस्त कैद्यांना भेटण्यासाठी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक दररोज मोठ्या संख्येत कारागृहात येतात. राज्याच्या विविध जिल्ह्यांतून हे नातेवाईक येतात. यात पैसा आणि वेळही खर्ची होतो. अनेकदा तर अनेक तास प्रतीक्षा करावी लागते. ही बाब लक्षात घेता कारागृह प्रशासनाने कैद्यांसाठी 'ई-मुलाखत'ची सुविधा प्रदान केली आहे. आता कैद्यांना 'व्हिडीओ कॉन्फन्सिंग'च्या माध्यमातून आपल्या कुटुंबीयांशी बोलता येईल. अमरावती मध्यवर्ती कारागृहात या सुविधेचा प्रारंभ झाला आहे.

कारागृह विभागाचे अपर पोलिस महासंचालक प्रशांत बुरडे यांच्या पुढाकाराने आणि कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम कैद्यांसाठी सुरू करण्यात आला आहे. शिक्षा भोगत असलेल्या बंद्यांना महिन्यातून दोन वेळा आणि विचाराधीन बंद्यांना आठवड्यातून एकदा नातेवाइकांना भेटण्याचा नियम आहे. कारागृहात बंदिस्त कैद्यांना भेटण्यासाठी नातेवाइकांना पैसे खर्च करून कारागृहात जावे लागते. त्यानंतर भेटीची परवानगी घेऊन नंबर येण्याची प्रतीक्षा करावी लागते. ही सर्व गुंतागुंतीची व खर्चिक प्रक्रिया असून, यामध्ये नातेवाइकांचा दिवसभराचा वेळ जातो. त्यासाठी ऑनलाइन भेटप्रणाली अत्यंत उपयुक्त असून, वेळ वाचवणारी असून, घरबसल्या भेट घेणे शक्य होते, अशी आहे.

अशी करावी नोंदणी
१) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भेट घेण्यासाठी प्रथम गुगलवर ई-प्रिझन या संकेतस्थळावर जावे लागेल. त्यानंतर ई-प्रिझन, एनआयसी.इन ही लिंक मिळेल, या पेजवर जाऊन ई-मुलाखतवर क्लिक करताच नवीन पेज उघडेल.
२) यामध्ये वकील किंवा नातेवाईक ज्यांना भेट घ्यायची असेल त्याची सर्व माहिती भरावी लागेल. आयडी प्रूफ साठी आधार कार्डची निवड करावी आणि समोरच्या बॉक्स मध्ये आधार कार्डचा नंबर टाकावा. सोबतच ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर टाकावा.
३) त्यानंतर एक वन टाइम पासवर्ड (ओटीपी) मिळेल. त्यानंतर दुसऱ्या बाजूला बंद्याची माहिती, ई-भेटीची तारीख आणि व्हिडीओ कॉन्फ्रन्सिग चा पर्याय निवडावा लागेल.
४) कॅप्चा कोड टाकल्यानंतर ओटीपी मिळेल. व्हिजिट रेफरन्स क्रमांक येईल. तो क्रमांक वकील किंवा नातेवाइकाला स्वतःकडे लिहून ठेवावा लागेल.

"नोंदणी केलेल्या 'ई-मेल आयडी' आणि मोबाइल क्रमांकावर कारागृहातून भेटीची वेळ मिळते. आधुनिक युगात जवळपास प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीकडे 'स्मार्टफोन' आहे. त्याद्वारे सहजरीत्या नोंदणी केली जाऊ शकते. वेळ, पैसा आणि श्रम वाचवण्यासाठी 'ई-मुलाखत' सोयीची आहे."
- कीर्ती चिंतामणी, अधीक्षक अमरावती मध्यवर्ती कारागृह

Web Title: 'E-interview' of prisoners with their families: Registration is required on the 'e-Prison' website on Google

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.