अमरावती ‘जेलब्रेक’प्रकरणी कर्तव्यावरील कर्मचारीच दोषी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2022 19:11 IST2022-07-02T19:10:03+5:302022-07-02T19:11:11+5:30

Amravati News ¯ मध्यवर्ती कारागृहाच्या बराक क्रमांक १२ मधून तीन कैद्यांनी कुलूप तोडून पलायन केल्याप्रकरणी कर्तव्यावरील सुरक्षा रक्षक दोषी असल्याचा प्राथमिक निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे.

Duty employees guilty in Amravati jailbreak case! | अमरावती ‘जेलब्रेक’प्रकरणी कर्तव्यावरील कर्मचारीच दोषी!

अमरावती ‘जेलब्रेक’प्रकरणी कर्तव्यावरील कर्मचारीच दोषी!

ठळक मुद्देबराकीचे तोडलेले कुलूप पोलिसांच्या ताब्यातचौकशी समितीने नोंदविले कैदी, कर्मचाऱ्यांचे बयाण

अमरावती : मध्यवर्ती कारागृहाच्या बराक क्रमांक १२ मधून तीन कैद्यांनी कुलूप तोडून पलायन केल्याप्रकरणी कर्तव्यावरील सुरक्षा रक्षक दोषी असल्याचा प्राथमिक निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे. दरम्यान शनिवारी चौकशीच्या तिसऱ्या दिवशी कर्मचारी आणि कैद्यांचे बयाण नोंदविण्याची प्रक्रिया सुरूच होती. रविवार, ३ जुलै रोजी चौकशी पूर्ण हाेणार असून, येत्या आठवड्यात अहवाल कारागृह प्रशासनाच्या डीआयजी स्वाती साठे यांच्याकडे सोपविला जाणार आहे.

अमरावती ‘जेलब्रेक’ प्रकरणाचा तपास डीआयजी साठे यांनी चंद्रपूर येथील जिल्हा कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे यांच्याकडे सोपविला आहे. त्यानुसार चौकशी समितीचे पथक गुरुवारपासून अमरावती मध्यवर्ती कारागृहात तळ ठोकून आहे. प्रारंभी चौकशी समितीने कारागृहातील घटनाक्रम जाणून घेतला. तीन कैदी पलायन झाल्याचा मार्ग, वापरण्यात आलेले अंथरूण, कारागृहाच्या तटाची उंची, आतील संरक्षण भिंतीची उंची, बराकीतून बाहेर पडल्यानंतर कोणत्या छतावरून कैद्यांनी पलायन केले, अशा विविध बाबींचा उलगडा करण्याचा प्रयत्न चौकशी समितीने केल्याची माहिती आहे.

‘जेलब्रेक’ प्रकरणाशी संबंधित १० कर्मचारी, सहा कैद्यांचे बयाण शनिवारपर्यंत नोंदविण्यात आले आहे. मात्र, चौकशी समितीने २८ जून रोजीच्या पहाटे १.३० ते २ वाजता घटनेच्या दिवशी कर्तव्यावरील सुरक्षा रक्षक, अंतर्गत सुरक्षा अधिकारी दोषी असल्याचे प्राथमिक निष्कर्ष काढले आहेत. तथापि, दोषी कोण? हे अहवाल प्राप्त झाल्यानंतरच निश्चित होईल, अशी माहिती आहे.

कैद्यांनी तोडलेले कुलूप पोलिसांकडून जप्त

बराक क्रमांक १२ मधून तीन कैद्यांनी कुलूप तोडून पलायन केले. हे तोडलेले कुलूप फ्रेजरपुरा पाेलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे; परंतु कुलूप तोडण्यासाठी कोणते साहित्य वापरण्यात आले, याचा उलगडा अद्यापही होऊ शकला नाही. कारागृह प्रशासनाने नेमलेली चौकशी समितीसुद्धा कुलूप तोडण्यात आल्याबाबत चकित झाली आहे. सुरक्षा व्यवस्थेत उणिवा असल्यामुळेच ‘जेलब्रेक’ झाले असे एकूणच चौकशीनंतरचे वास्तव आहे.

दोषींवर होणार निलंबनाची कारवाई

बराकीचे कुलूप तोडून तीन कैद्यांनी पलायन केल्याप्रकरणी ४ ते ५ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार असल्याचे दिसून येते. ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेमुळेच कैद्यांनी पलायन होण्याचे षड्यंत्र रचले, असेही चौकशी समितीच्या निदर्शनास आल्याचे विश्वासू सूत्रांनी सांगितले. त्यामुळे येत्या आठवड्यात ४ ते ५ कर्मचाऱ्यांचे निलंबन होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

Web Title: Duty employees guilty in Amravati jailbreak case!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jailतुरुंग